अंडर-19 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सुपर 6 फेरीतून सेमीफायनलचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ग्रुप-1 मधून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांनी सेमीफायनलचे तिकीट आधीच निश्चित केले आहे. तर ग्रुप-2 मधून इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला असून आता चौथ्या आणि अंतिम सेमीफायनलिस्टचा निर्णय भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यातून होणार आहे. हा सामना 1 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार असून, त्याआधीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद शयान दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सराव सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर यष्टीरक्षण करत असताना चेंडू थेट शयानच्या नाकाला लागला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्कॅन अहवालात नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) निवेदन जारी करत शयान स्पर्धेबाहेर झाल्याची पुष्टी केली असून, लवकरच त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली जाईल, असे सांगितले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, मोहम्मद शयान यष्टीरक्षक असला तरी पाकिस्तान संघात हमजा जहूर हा मुख्य विकेटकीपर म्हणून आधीपासूनच संघाचा भाग आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी आणि पुढील फेरीसाठी पाकिस्तानला नव्या विकेटकीपरची तातडीची गरज भासणार नाही, असे मानले जात आहे. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथसाठी ही दुखापत नक्कीच चिंतेची बाब आहे.
पाकिस्तानचा अंडर-19 वर्ल्ड कपमधील प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केले. स्कॉटलंडला 6 विकेट्सने हरवले. त्यानंतर झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडवर प्रत्येकी 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत सुपर 6 मध्ये स्थान मिळवले. आता मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हरवणे पाकिस्तानसाठी अनिवार्य ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. सुरुवातीच्या काही वर्षांत पाकिस्तानचा दबदबा राहिला असला, तरी 2010 नंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. सध्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पर्धेत अपराजित असून, पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत सेमीफायनलची तिकिट पक्की करण्याचा भारताचा निर्धार आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीचा हा सामना केवळ सामना नसून, दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेची आणि भवितव्य ठरवणारी लढत ठरणार आहे.






