अॅडलेड। आजपासून(6 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामना सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली आहे. भारताने पहिल्या सत्रातील 21 षटकातच पहिल्या चार विकेट्स गमावल्या आहेत.
भारताकडून या सामन्यात केएल राहुल आणि मुरली विजय ही जो़डी सलीमीला फलंदाजी करण्यासाठी उतरली होती परंतू राहुलने दुसऱ्याच षटकात जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर दोन धावांवर असताना विकेट गमावली. जोश हेझलवूडने टाकलेला चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन तिसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या अॅरॉन फिंचकडे गेला. फिंचनेही चूक न करता झेल घेतला.
त्याच्यानंतर सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने फुल लेन्थवर टाकलेल्या चेंडूवर विजय ड्राईव्हचा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक टीम पेनने घेतला. विजयने 11 धावा केल्या
त्याच्या पाठोपाठ भारताचा कर्णधार विराट कोहलीही 3 धावांवर खेळत असताना 11 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिंन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. कोहलीचा झेल गलीमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या उस्मान ख्वाजाने घेतला.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या चेतेश्वर पुजाराने अंजिंक्य रहाणेला साथीला घेत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही भागीदारी रंगेल असे वाटले असतानाच 21 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेझलवूडने रहाणेला 13 धावांवर असताना बाद केले. रहाणेचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या पिटर हँड्सकॉम्बने घेतला.
त्यामुळे भारताची अवस्था 20.2 षटकात 4 बाद 41 धावा अशी झाली. विशेष म्हणजे बाद झालेले पहिले चारही फलंदाज ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाले आहेत.
पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संपले त्यावेळी भारत 27 षटकात 4 बाद 56 धावांवर खेळत असून चेतेश्वर पुजारा 11 धावांवर आणि रोहित शर्मा 15 धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पहिला कसोटी सामना टीम इंडिया जिंकणारच, जाणुन घ्या कारण
–बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाची ऐतिहासिक ट्विटरबाजी
–असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास
–अंदाज दिग्गजांचे: कोण जिंकणार भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका?