भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये २०२१ ला होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने महिला वनडे चॅम्पियनशीपच्या ३ मालिका रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता भारत या विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
रद्द झालेल्या ३ मालिंकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांची मालिकादेखील होती. ही मालिका नोव्हेंबर २०१९ मध्येच होणार होती. परंतू भारत-पाकिस्तान या देशांमधील तणावामुळे ही मालिका झाली नव्हती. त्याचबरोबर या मालिकेसाठी भारतीय सरकारकडून परवानगी न मिळाल्याने ही मालिका रद्द करण्यात आली आहे.
वनडे चॅम्पियनशीपमध्ये प्रत्येक संघाच्या २१ सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया संघ ३७ गुणांसह अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. तर इंग्लंड २९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. याबरोबरच दक्षिण आफ्रिका (२५) आणि भारत (२३) गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता हे ४ संघ महिला विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत.
त्याचबरोबर या चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडसंघ १७ गुणांसह सहाव्या क्रमांकावर असला तरी २०२१ विश्वचषकाचा तो यजमान संघ असल्याने त्यांनाही या विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला आहे.
या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या इतर ३ संघाचा निर्णय हा पात्रता फेरीने होईल. हा विश्वचषक पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान खेळविण्यात येईल.
आयसीसी महिला विश्वचषकाची पात्रता फेरी श्रीलंकामध्ये ३ ते १९ जुलै दरम्यान खेळण्यात येणार होती. यामध्ये श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, बांगलादेश, आयर्लंड, थायलंड, झिंबाब्वे, पापुआ न्यू गिनी, अमेरिका आणि नेदरलँड या संघाचा समावेश होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) ही चॅम्पियनशीप स्थगित करावी लागली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महिला टी२० विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघातील उपांत्य सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आणि राखीव दिवस नसल्याने रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार अ गटात अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. India qualify for Women’s World Cup 2021
या विश्वचषकात सहभागी होणारे ८ संघ राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरी सुरु असताना एकमेकांशी सामना खेळेल. हे सामने झाल्यानंतर अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीतून विजयी झालेले २ संघ अंतिम सामना खेळतील.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर्स
-सुरेश रैनाने केलेत गंभीर आरोप, टीम इंडियाशी संबंधित या लोकांवर साधला निशाना
-काय सांगता! कसोटीमध्ये चौथ्या डावात या ५ खेळाडूंनी केली आहे द्विशतके