क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात द्विशतक करणे म्हणजे फलंदाजाच्या कौशल्याची आणि मानसिकतेची परिक्षाच असते. पण तरीही क्रिकेटमध्ये सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत १९४ खेळाडूंनी द्विशतके केली आहेत. त्यातही कसोटीमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करणे सर्वात अवघड मानले जाते. त्या डावात शतक करणाऱ्या खेळाडूचेही मोठे कौतुक होते. त्यामुळे या डावात द्विशतक करणे महाकठीण. पण असा कारनामा आत्तापर्यंत ५ खेळाडूंनी केला आहे. त्याच खेळाडूंचा आढावा –
कसोटीच्या चौथ्या डावात द्विशतक करणारे फलंदाज (double century scored in the fourth innings of a Test) –
१. जॉर्ज हॅडली –
चौथ्या डावात सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू जॉर्ज हॅडली यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंड विरुद्ध १९३० ला किंग्सटन येथे खेळताना चौथ्या डावात २२३ धावा केल्या होत्या. त्यावेळीचा काळ हा अनिश्चित काळासाठी चालणाऱ्या कसोटी सामन्यांचा होता, म्हणजेच जोपर्यंत सामन्याच्या निकाल लागायचा नाही तोपर्यंत कसोटी सामना चालू रहायचा.
किंग्सटन येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना तब्बल ८४९ धावांची धावसंख्या उभारली होती. त्याच्या प्रतिउत्तरादाखल वेस्ट इंडिजला पहिल्या डावात २८६ धावाच करता आल्या होत्या. पण तरीही इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसरा डाव ९ बाग २७२ धावांवर घोषित केला आणि वेस्ट इंडिजला चौथ्या डावात विजयासाठी ८३५ धावांचे आव्हान दिले.
यावेळी हॅडली वेस्ट इंडिजकडून चौथ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आले. त्यांनी ३८५ चेंडूत २२३ धावांची खेळी केली. या खेळीत त्यांनी २८ चौकार मारले. त्यांच्याबरोबरच वेस्ट इंडिजकडून कर्णधार कार्ल न्यून्सने ९२ धावांची खेळी केली होती. हॅडली यांनी हे द्विशतक सातव्या दिवशीचा खेळ सुरु असताना केले होते.
त्यावेळी ते चौथ्या डावात द्विशतक करणारे पहिले फलंदाज होते. त्यांना बॉब व्यॅट यांनी बाद केले. नंतर २ दिवस पावसामुळे वाया गेल्याने अखेर दोन्ही संघांच्यां कर्णधारांच्या संमंतीने हा सामना अनिर्णित ठेवण्यात आला. अनिश्चित काळासाठी चालणाऱ्या कसोटी सामन्यांपैकी कर्णधारांच्या सहमतीने अनिर्णित राहिलेला हा पहिला सामना आहे.
२. विल्यम एड्रिच –
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू विल्यम एड्रिच यांनी १९३८-३९ च्या मोसमात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील डर्बन येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात द्विशतक केले होते. तो काळही अनिश्चित काळासाठी चालणाऱ्या कसोटी सामन्यांचा होता.
डर्बनला झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५३० धावा करत इंग्लंडचा पहिला डाव ३१६ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात ४८१ धावा करत इंग्लंडला ६९६ धावांचे आव्हान दिले.
इंग्लंडकडून चौथ्या डावात ६९६ धावांचा पाठलाग करताना एड्रिच यांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४६० चेंडूत २५ चौकारांसह २१९ धावांची खेळी केली. त्यांच्याबरोबरच पॉल गिब्स यांनी १२० धावांची आणि कर्णधार वॉली हेमंड यांनी १४० धावांची खेळी केली होती. पण इंग्लंड ५ बाद ६५४ धावांवर असताना सामन्याच्या १० व्या दिवशी दोन्ही कर्णधारांच्या सहमतीने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
३. सुनील गावस्कर –
भारताने माजी कर्णधार सुनील गावस्करांनी १९७९ ला इंग्लंड विरुद्ध लंडन येथे द ओव्हल मैदानावर कसोटी सामना खेळताना चौथ्या डावात द्विशतक केले होते. त्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३०५ धावा करत भारताचा पहिला डाव २०२ धावांवर संपुष्टात आणला होता. त्यामुळे १०३ धावांची आघाडी त्यांनी घेतली होती. या आघाडीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डाव ८ बाद ३३४ धावांवर घोषित केला आणि भारतासमोर ४३८धावांचे आव्हान दिले.
या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून गावस्कर आणि चेतन चौहानने चांगली सुरुवात केली. त्यांनी चौथ्या दिवसाखेर कोणतीही विकेट न गमावता ७६ धावा केल्या. तसेच पाचव्या दिवसापर्यंत या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २१३ धावांची सलामी भागीदारी रचली. चौहानने ८० धावा केल्या. ते बाद झाल्यावर वेंगसकरांनी गावस्करांना चांगली साथ देताना ५२ धावा केल्या.
पण भारताची मधली फळी गडगडली. मात्र गावस्करांनी केलेल्या ४४३ चेंडूत २२१ धावांच्या खेळीने भारताला अशक्य वाटणारा विजय शक्य वाटत होता. मात्र या कसोटीत भारताला शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. त्या १५ धावा न करता आल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
४. गोर्डन ग्रिनिज –
१९८३-८४ च्या कसोटी मालिकेत किंग्सटन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या सामन्यातील चौथ्या डावात वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू गोर्डन ग्रिनिज यांनी द्विशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात इंग्लंडने शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला ३४२ धावांचे मोठे आव्हान दिले होते. तसेच त्यावेळी केवळ ७८ षटके बाकी होती.
इंग्लंडने या सामन्यात आधी वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४५ धावांवर संपुष्टात आणला होता. मात्र वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात मात्र भक्कम फलंदाजी केली. ३४२ धावांच्या आव्हानाचा दुसऱ्या डावात पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून ग्रिनिज यांनी २४२ चेंडूत २९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २१४ धावा करत वेस्ट इंडिजला ९ विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांना लॅरी गोम्स यांनी नाबाद ९२ धावा करत चांगली साथ दिली.
५.नॅथन ऍस्टल –
२००२ ला ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा क्रिकेटपटू नॅथन ऍस्टलने चौथ्या डावात द्विशतक करण्याचा कारनामा केला होता. त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडला पहिल्या डावात १४७ धावांवर रोखले होते. त्यामुळे इंग्लंड या सामन्यात भक्कम स्थितीत होता. त्यांनी दुसरा डाव ६ बाद ४६८ धावांवर घोषित करत न्यूझीलंडला ५५० धावांचे मोठे आव्हान दिले.
चौथ्या डावात या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडकडून मार्क रिचर्डसनने ७६ धावा करत चांगली सुरुवात केली. पण त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली. याचवेळी ५ व्या क्रमांकावर आलेला ऍस्टलने एक बाजू सांभाळली होती.
पण न्यूझीलंडने ३३३ धावांवर ९ वी विकेट गमावल्यावर दुखापतग्रस्त ख्रिस केर्न्स फलंदाजीला आला. त्यावेळी ऍस्टलने आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. त्याने केवळ १५३ चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले. कसोटीमध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रमही त्याने त्या सामन्यात केला.
त्याने २८ चौकार आणि ११ षटकारांसह २२२ धावा केल्या. पण अखेर त्याला मॅथ्यू होगार्डने बाद करत न्यूझीलंडचा डाव ४५१ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडने हा सामना ९८ धावांनी जिंकला.
ट्रेंडिंग घडामोडी –
अगदी कोणताही खेळाडू खेळला तरी कसोटी क्रिकेटमध्ये हे ५ विक्रम होणे जवळपास अशक्यचं
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणारे ५ कसोटीपटू