भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिका आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. अॅडेलेडच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळविला होता तर मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असून अजून दोन सामने शिल्लक आहेत. मात्र या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियन संघच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे वक्तव्य वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने केले आहे.
“स्मिथ-लॅब्यूशानेला फॉर्म गवसेल”
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी या मालिकेत अपयशी ठरते आहे. विशेषतः त्यांचे भरवशाचे फलंदाज स्टीव स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांना सूर गवसला नाही आहे. स्टीव स्मिथ तर या मालिकेत दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. मात्र कमिन्सने ही चिंतेची बाब नसल्यचे स्पष्ट केले. तो म्हणाला, “त्यांच्यावर अजिबात दबाव नाही. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असे चढ-उतार येत असतात. मात्र महान खेळाडू त्यातून मार्ग शोधतात. ते दोघेही यातून मार्ग काढतील, याची आम्हाला खात्री आहे. शिवाय त्यांना चांगल्या फॉर्मसाठी फार मागे पाहण्याची गरज नाही. स्मिथने महिन्याभरापूर्वी ६० चेंडूत शतक लगावले होते.”
अवघ्या दोन सामन्यातून निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही कमिन्सने यावेळी बोलताना सांगितले. “सगळ्याच फॉरमॅट आमचे त्यांच्या गोलंदाजीविरुद्धचे आकडे चांगले आहेत. अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ज्यातून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. आत्ता फक्त दोन कसोटी सामने आणि चार डाव झाले आहेत. त्यामुळे आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. तंत्र किंवा दृष्टीकोन बदलावा, असे काही झाले नाही आहे. मात्र नक्कीच काही विभागात आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे.”
या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात होईल. हा सामना सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येणार असून तिथल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोन्ही संघ ४ तारखेपर्यंत मेलबर्नमध्येच सराव करणार आहेत.
संबधित बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– ऑस्ट्रेलियन फलंदाजीत ही सर्वात मोठी उणीव, सचिन तेंडुलकर यांनी केले स्पष्ट
– ४ जानेवारीपर्यंत मेलबर्नमधेच सराव करणार भारतीय संघ, हे आहे कारण