पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून इतिहास रचणाऱ्या बांगलादेश संघासमोर आता भारताचं आव्हान आहे. बांगलादेशचा संघ 19 सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर येईल. येथे संघाला 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेपूर्वी बांगलादेशचा कॅम्प तणावात आहे. संघाच्या या तणावाचं कारण म्हणजे मालिकेत वापरण्यात येणार चेंडू! कसं ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो.
वास्तविक, बांगलादेशचा संघ भारतात वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या ‘एसजी टेस्ट बॉल’ला घाबरतो. बांगलादेशला ‘कुकाबुरा’ चेंडूनं खेळण्याची सवय आहे. पाकिस्तान दौऱ्यातही त्यांनी कुकाबुरा चेंडूनं इतिहास रचला होता.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एसजी बॉल, कुकाबुरा बॉल आणि ड्यूक बॉलचा वापर केला जातो. प्रत्येक देश आपल्या आवडीनुसार या चेंडूंचा वापर करतो. एसजी बॉल फक्त भारतातच वापरला जातो. कुकाबुरा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे वापरतात, तर ड्यूक बॉल इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये वापरला जातो. एसजी बॉल भारतात, कूकाबुरा ऑस्ट्रेलियात आणि ड्यूक बॉल इंग्लंडमध्ये तयार होतो.
जर आपण एसजी आणि कुकाबुरामधील फरकाबद्दल बोललो तर, दोन चेंडूंमधील मुख्य फरक म्हणजे शिलाई. एसजी बॉलची शिलाई हातानं केली जाते. तर कुकाबुराची शिलाई मशीनद्वारे केली जाते. मशीन स्टिचिंगमुळे चेंडूला जास्त सीम मुव्हमेंट मिळत नाही. हातानं शिलाई केल्यामुळे एसजीची सीम जास्त बाहेर आलेली असते. त्यामुळे सीम मुव्हमेंट जास्त मिळते. भारतातील खेळपट्ट्या खडबडीत असतात. त्यामुळे येथे एसजीसारख्या चेंडूची आवश्यकता असते, जो बराच काळ आपला आकार गमावत नाही. आशियाई खेळपट्ट्यांवर, इतर चेंडूंच्या तुलनेत एसजी बॉलसह रिव्हर्स स्विंग देखील अधिक मिळतो. तर, कुकाबुरा चेंडू उसळत्या खेळपट्ट्यांसाठी योग्य आहे.
एसजी चेंडूसमोर म्हणजेच भारताच्या खेळपट्ट्यांवर बांगलादेशच्या संघानं नेहमीच संघर्ष केला आहे. दोन्ही संघांनी आपापसात एकूण 13 कसोटी सामने खेळले, ज्यात बांगलादेशी फलंदाजांची सरासरी 22.07 आहे. भारतीय खेळपट्टीवर हे फलंदाज एसजी चेंडूला सामोरे जाताच ही सरासरी 20.67 पर्यंत घसरते. भारतीय खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा सामना करताना बांगलादेशच्या फलंदाजांची सरासरी केवळ 17.29 आहे. 2002 पासून भारतीय दौऱ्यावर 2 किंवा अधिक सामने खेळणाऱ्या कोणत्याही संघातील ही सर्वात कमी सरासरी आहे.
हेही वाचा –
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी अन् कुठे होणार? संभाव्य तारीख, ठिकाण आणि रिटेन होणाऱ्या खेळाडूंची नावं जाणून घ्या
काय सांगता! एकाच संघाकडून खेळणार विराट कोहली अन् बाबर आझम? या स्पर्धेत जुळतील योग
टीम इंडियातील पुनरागमन लांबलं! दुलीप ट्रॉफीत ऋतुराज गंभीर जखमी