19 सप्टेंबरपासून भारतीय संघांच्या कसोटी हंगामाला सुरुवात होणार आहे. टीम इंडियानं आपली शेवटची मालिका श्रीलंकेत खेळली होती. त्यानंतर भारतीय संघाला जवळपास 40 दिवसांचा ब्रेक मिळाला. आता ब्रेक संपल्यानंतर खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीला लागले आहेत.
टीम इंडियाला कसोटी हंगामातील पहिली मालिका घरच्या भूमीवर बांगलादेशविरुद्ध खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळले जातील. त्यानंतर तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजनही होणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली जाईल. सध्या भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत.
टीम इंडियानं बांगलादेशविरुद्ध अद्याप एकही कसोटी गमावलेली नाही. त्यामुळे या मालिकेत भारताचं पारडं निश्चितच जड आहे. मात्र बांगलादेशनं नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा पराभव करून सर्वांनाच चकित केलं. त्यामुळे भारतीय संघ बांगलादेशला हलक्यात घेऊ शकत नाही. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा मालिका अपेक्षित आहे.
हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झाल्यास, उभय संघांमध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले गेले, ज्यापैकी भारतानं 11 सामने जिंकले तर 2 सामने अनिर्णित राहिले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना चेन्नई येथे खेळला जाईल. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतील. नाणेफेकीची वेळ सकाळी 9 वाजताची आहे.
पहिली कसोटी – 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई, सकाळी 9.30 वा
दुसरी कसोटी – 27 ते 1 ऑक्टोबर, कानपूर, सकाळी 9.30 वा
कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकीर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद
हेही वाचा –
पाकिस्तानात विराट कोहलीची जबरदस्त क्रेझ! खास फोटो झाला व्हायरल
इशान किशनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक ठोकल्यानंतर शेअर केली दोन शब्दांची सूचक पोस्ट
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 19 शतकं, मात्र अजूनही टीम इंडियात स्थान नाही; या फलंदाजानं मधल्या फळीसाठी ठोकला दावा