इंग्लंडच्या बहुप्रतिक्षीत भारत दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील सामन्याने सुरुवात होत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाले असून २ फेब्रुवारीपासून ते सरावाला सुरुवात करतील. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही संघांची पहिल्या सामन्याची संभाव्य प्लेईंग इलेव्हन काय असेल, यावर चर्चा सुरु झाली आहे.
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने देखील पहिल्या कसोटी सामन्यासाठीची प्लेईंग इलेव्हन निवडली आहे. या संघात त्याने अक्षर पटेलचा समावेश केला असून उर्वरित संघात अपेक्षित खेळाडूंना संधी दिली आहे.
सुंदरऐवजी अक्षर पटेलला संधी
आपल्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनमध्ये जाफरने सलामीच्या स्थानी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची निवड केली आहे. मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये त्याने चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना संधी दिली आहे. यष्टीरक्षकाच्या जागी वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यात कोणाला संधी मिळणार, अशी चर्चा असताना जाफरने मात्र पंतला आपली पसंती दर्शविली आहे.
जाफरने अष्टपैलूच्या स्थानासाठी अनपेक्षित निर्णय घेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या वाॅशिंग्टन सुंदरला वगळून त्याच्या जागी अक्षर पटेलला स्थान दिले आहे. याशिवाय गोलंदाजी आक्रमणात जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांचा निश्चित रुपात समावेश जाफरने केला आहे. मात्र दुसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा हे दोन्ही पर्याय दिले आहेत. तसेच परिस्थिती आणि खेळपट्टी पाहून शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव, यांच्यापैकी एकाची निवड करावी, असेही सूचित केले आहे.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होणार असून दुसरा सामना देखील १३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळवला जाणार आहे. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ फेब्रुवारी आणि ४ मार्चपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवले जातील.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडच्या फिरकीपटूने फुंकले मालिकेचे रणशिंग, म्हणाला
माजी यष्टीरक्षकाने दिल्या भारतीय संघाला कानपिचक्या, म्हणाला
भारतीय खेळाडू विराटला घाबरतात, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य