भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ६ विकेट्सने पराभूत केले. विशेष म्हणजे, यापूर्वीचे दोन्ही सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केले होते. अशात हा सामना जिंकत भारताने मालिका खिशात घातली आणि श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. भारताच्या या विजयाचा हिरो श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ठरला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय खेळाडूंनी त्यांचा हा निर्णय चुकीचा सिद्ध केला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १४६ धावां ठोकल्या होत्या. तसेच, भारतापुढे १४७ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने १७ षटकांच्या आतच पूर्ण केले.
India complete a 3-0 clean sweep 🙌
They win the third T20I against Sri Lanka in Dharamsala by six wickets 💪#INDvSL pic.twitter.com/52HbFDrrBn
— ICC (@ICC) February 27, 2022
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना नाबाद ७३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ९ चौकारही ठोकले. श्रेयसचे हे या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक होते. श्रेयसव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (२२), दीपक हुडा (२१) आणि संजू सॅमसन (१८) यांनीही आपापले योगदान दिले. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टी२० सामन्याप्रमाणे काही खास कामगिरी न करताच ५ धावांवर तंबूत परतला.
यावेळी श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना लहिरू कुमाराने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याने ३.५ षटके गोलंदाजी करताना ३९ धावा देत ही कामगिरी केली. कुमाराव्यतिरिक्त दुष्मंता चमीरा आणि चमिका करुणारत्नेने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाकडून कर्णधार दसून शनाकाने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ७४ धावा कुटल्या होत्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकारही ठोकले होते. शनाकाव्यतिरिक्त दिनेश चंडीमलने २२ धावांचे योगदान दिले. बाकीच्या ५ खेळाडूंना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज आवेश खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत २ विकेट्स आपल्या खिशात घातल्या. तसेच, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई या गोलंदाजांनीही प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
या सामन्यादरम्यानची महत्त्वाची माहिती अशी की, श्रीलंकेचा गोलंदाज दुष्मंता चमीराने रोहित शर्माला अवघ्या ५ धावांवर तंबूत पाठवले. विशेष म्हणजे, या मालिकेत रोहित सलग दोनदा चमीराच्या हातून बाद झाला. चमीरा रोहितला टी२० त सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाजही बनला. त्याने रोहितला आतापर्यंत ६ वेळा बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर
श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना