---Advertisement---

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 4:27 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला आहे. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी बिनबाद 17 धावा केल्या. न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने 11 आणि मार्टिन गप्टिलने 5 धावा केल्या. या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 18 धावांचे आव्हान होते. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने फलंदाजी केली. यावेळी भारताने पहिल्या 4 चेंडूत 8 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. पण त्यावेळी रोहितने दोन्ही चेंडूवर षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. या सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 धावा केल्या. तर राहुलने 5 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने गोलंदाजी केली.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या आणि 180 धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते. भारताकडून रोहित शर्माने 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 38 धावांची छोटेखानी खेळी केली. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार केन विलियम्सनने 95 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर गप्टिलने 31 धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---