भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघाने ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा २-१ ने विजय झाला आहे. परंतु भारतीय संघाला शेवटच्या सामन्यात जर विजय मिळवला असता तर श्रीलंका संघाला क्लीन स्वीप करता आले असते. परंतु शेवटच्या सामन्यात संघात बदल करण्यात आले होते. हे बदल पराभवाचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे.
शेवटच्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवामुळे अनेक खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यातही पूर्ण मालिकेत सर्वात जास्त नाराज मनीष पांडेने केले आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे देखील असेच मत आहे. त्यामुळे मनीष पांडेसाठी पुढचा मार्ग खूप कठीण होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
श्रीलंका विरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मनीष पांडे मैदानावर उतरत होता. तो नेहमी अशा परिस्थितीत मैदानावर उतरला होता, जेथून भारतीय संघाला सहज विजय मिळवून देण्यास मदत करू शकला असता. परंतु तो यामध्ये अपयशी ठरला आहे. मनीष पांडेने तिन्ही सामन्यांमध्ये फक्त ७४ धावा केल्या आहेत.
यासंदर्भात वीरेंद्र सेहवागने क्रिकबजसोबत बोलताना सांगितले की, “या सामन्यांमध्ये मनीष पांडे त्याचबरोबर हार्दिक पांड्याला देखील स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. या दोघांना जवळजवळ १५-२० धावा बनवायच्या होत्या. यातही हे दोघे अपयशी ठरले. त्यामुळे या दोघांनीही मला खूप निराश केले आहे. त्याचबरोबर या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो मनिष पांडे होता. कारण त्याने तिन्ही सामने खेळले आहेत आणि फलंदाजी देखील करण्याची त्याला संधी मिळाली होती. परिस्थिती आव्हानात्मक देखील नव्हती की त्याला वेगानेच धावा बनवायच्या आहेत. असे काही नसूनही तो धावा करू शकला नाही.”
त्याचबरोबर वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाले की, “माझे असे मत आहे की मनीष पांडेने मला सर्वात जास्त नाराज केले. कदाचित त्याला आता एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात संधी मिळणार नाही आणि तसे झाले तरी बराच काळ लोटला जाईल. कारण त्याने या ३ सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही. म्हणूनच तो बाकीच्या खेळाडूंपेक्षा मागे राहिला आहे. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी धावा केल्या आहेत. त्यामुळे मधल्या फळीत या दोघांनाही मनीष पांडेच्या पुढे मानले जाईल.”
आता हे पाहणे महत्वाचे असे की, टी२० मालिकेसाठी भारतीय संघात मनीष पांडेला स्थान मिळेल का? आणि जरी स्थान मिळाले तर तो चांगली कामगिरी करू शकेल का?.
महत्त्वाच्या बातम्या-
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
एकच लक्ष्य, पुनरागमन फक्त; कसोटी संघातून बाहेर असलेला उमेश ट्रेनिंगदरम्यान गाळतोय घाम
धोनी नव्हे तर ‘हा’ दिग्गज होता भारतीय टी२० संघाचा पहिला कर्णधार, धवन असेल केवळ सातवा