भारतीय कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेलबर्न येथे चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ८६ धावांनी आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १९५ धावांचे लक्ष्य पूर्ण करत भारताने ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. रहाणे आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा नाबाद फलंदाजी करत आहे.
गिल, पुजारानंतर सांभाळला संघाचा डाव
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी युवा भारतीय फलंदाज शुबमन गिल आणि अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांनी १ बाद ३६ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली होती. परंतु ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्यांना लवकरच तंबूत धाडले. गिल ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा करत बाद झाला; तर पुजारा एका चौकाराच्या मदतीने १७ धावांवर मैदानाबाहेर पडला. त्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
कर्णधार म्हणून पहिलेच शतक
रहाणेने संयमी फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाखेर नाबाद १०४ धावा केल्या. २०० चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली. एक कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेने केलेले हे पहिलेच शतक आहे. यापुर्वी २०१४ साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. पण त्यावेळी रहाणेच्या हातात संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे नव्हती.
विराटने सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलंय शतक
रहाणेपुर्वी भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक चार वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक लगावले आहे. २०१४ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ शतके केली होती; तर २०१५ आणि २०१८ मध्ये प्रत्येकी एका शतकाची भर घातली होती. तसेच सौरव गांगुली (२००३ वर्ष), सचिन तेंडूलकर (१९९९ वर्ष) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९९२ वर्ष) या भारतीय कसोटी कर्णाधारांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक शतक ठोकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाहुणा नंबर १..! मेलबर्नच्या मैदानावर ‘अशी’ कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे पहिलाच परदेशी क्रिकेटर
व्वा रे अजिंक्य! भारतात तर केलीच पण या ५ देशातही ठोकलीत दमदार शतकं
भारीच! मेलबर्नच्या मैदानावर शतक करणारा रहाणे केवळ दुसराच भारतीय कर्णधार; पाहा पहिलं नाव कुणाचं