आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. ऑस्ट्रेलियाने भारताला या महत्त्वाच्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत करत 6व्यांदा विश्वचषक किताब नावावर केला. हा सामना सुरू होण्यापूर्वी सकाळी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची आई अंजुम आरा यांना चक्कर आल्यानंतर डॉक्टरांकडे नेण्यात आले. शमीचे कुटुंब अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार होते, पण आईची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माध्यमांतील वृत्तांनुसार, मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचा मोठा भाऊ हसीब आणि त्याचे कुटुंबच नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे अंतिम सामना पाहण्यासाठी जाऊ शकले. उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये त्याच्या आईने एक दिवसापर्वीच मुलगा आणि भारतीय संघाला विश्वचषक विजेता बनण्यासाठी प्रार्थना केली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी भीती आणि चक्कर आल्याच्या तक्रारीनंतर मुरादाबाद येथील सुपरटेक मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, चिंता करण्यासारखी गोष्ट नाहीये. त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल.
शमीचे प्रदर्शन
भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक किताब जिंकण्यात अपयशी ठरला. असे असले, तरीही शमी स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. त्याला पहिल्या चार सामन्यांसाठी बाहेर ठेवले गेले होते. मात्र, त्याने खेळलेल्या 7 सामन्यात 10.23च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमी रेटने 24 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने 3 वेळा एका डावात 5 विकेट्स आणि 1 वेळा 4 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.
शमीचा कहर
मोहम्मद शमीने मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम येथे खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली होती. त्याने 9.5 षटकात 57 धावा खर्चून 7 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे भारतीय संघाने न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. (indian pacer mohammed shamis mother admitted to hospital)
हेही वाचा-
INDvsAUS FINAL: न संपणारं दु:ख! 2013नंतर ICC बादफेरीत भारत ‘एवढ्या’ वेळा झालाय पराभूत, वाचून वाटेल वाईट
CWC 2023 मध्ये भारतीय गोलंदाजांनी घडवला इतिहास! रोहितसेनेकडून ऑस्ट्रेलियाचा 16 वर्षे जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त