टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये रविवारी (३१ ऑक्टोबर) आमना सामना होणार आहे. यापूर्वी हे संघ टी-२० विश्वचषकात दोन वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघातील ही तिसरी लढत असून विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ यापूर्वी झालेल्या दोन पराभवांचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दारुण पराभव केला आहे. आता भारताला उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे असणार आहे.
न्यूझीलंडने यापूर्वी भारताला २०१६ टी-२० विश्वचषकात त्याच्या मायदेशात पराभवाची धुळ चारली होती. तसेच २००७ साली पहिल्या टी२० विश्वचषकातही न्यूझीलंडने भारताला सुपर ८ फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले होते. २००७ साली जेव्हा न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता, तेव्हा भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू होते.
आपण या लेखात २००७ सालच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील भारतीय प्लेइंग इलेव्हनविषयी माहिती घेणार आहोत. तसेच हे खेळाडू सध्या काय करतात हेदेखील आपण पाहणार आहोत.
टी-२० विश्वचषक २००७ मध्ये न्याझीलंडविरुद्ध खेळलेली भारताची प्लेइंग इलेव्हन सध्या काय करते?
सलामीवीर फलंदाज – विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर
या सामन्यात न्यूझीलंडने भारतासोबत १९० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने भारतीय संघाला एक चांगली सुरुवात दिली होती. सेहवाग आणि गंभीरच्या सलामीवीर जोडीने या सामन्यात सुरुवातीच्या सहा षटकांमध्ये ७६ धावांचा टप्पा गाठला होता.
या सामन्यात सेहवागने १७ चेंडूत ४० आणि गंभीरने ३३ चेंडूत ५१ धावांची महत्वाची खेळी केली होती. सध्या या भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी क्रिकेटच्या तिनही प्रकारांमधून निवृत्ती घेतलेली आहे. गंभीर सध्या दिल्लीमधून खासदार आहे आणि विरेंद्र सेहवाग सध्या एका क्रिकेट तज्ञाच्या रूपात त्याची कारकिर्द पुढे घेऊन जात आहे.
मधली फळी – रॉबिन उथप्पा, एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक
भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात २४ धावा करून बाद झाला होता. तर रॉबिन उथप्पा दुर्दैवाने एकही धाव न करता दुसऱ्याच चेंडूवर न्यूझीलंडच्या डॅनियल विटोरीच्या चेंडूवर बाद झाला होता. तसेच दिनेश कार्तिक कार्तिकही या सामन्यात काही खास प्रदर्शन करू शकला नव्हता. दिनेशने सामन्यात अवघ्या १७ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्ध २००७ मध्ये खेळलेल्या या तीन खेळाडूंपैकी दिनेश आणि उथप्पाने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. तर एमएस धोनीने मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे, पण तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करतो. याव्यतिरिक्त धोनी यावर्षी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा मेंटॉरही आहे.
अष्टपैलू – युवराज सिंग आणि इरफान पठाण
युवराज सिंग आणि इरफान पठाण हे दोन्ही अष्टपैलू न्यूझीलंडविरुद्ध २००७ साली खेळल्या गेलेल्या सामन्यात अपेक्षित प्रदर्शन करू शकले नव्हते. युवराजने या सामन्यात फलंदाजी करताना केवळ ५ धावा केल्या, तसेच गोलंदाजी करताना एक विकेट मिळवली होती. तसेच इरफान पठाणने या सामन्यात दोन षटकांमध्ये १६ धावा दिल्या आणि फलंदाजी करताना त्याने ११ धावा केल्या होत्या.
या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण ते विदेशी टी-२० स्पर्धेत अजूनही खेळताना दिसतात. इरफान सध्या टी-२० विश्वचषकात हिंदी समालोचन करत आहे.
गोलंदाज – अजित आगरकर, श्रीशांत, हरभजन सिंग आणि आरपी सिंग
या सामन्यात अजित आगरकर, श्रीशांत आणि आरपी सिंग हे तीन वेगवान गोलंदाज होते. या तीन गोलंदाजांनी सामन्यात घेतलेल्या एकूण विकेट्सची संख्या ३ होती, ज्यापैकी दोन विकेट्स आरपी सिंगने घेतले होते. आरपी सिंग आणि अजित आगरकरने बऱ्याच दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर दुसरीकडे श्रीशांतने नुकतेच ७ वर्षांच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने या सामन्यात संघासाठी किफायतशीर गोलंदाजी केली होती. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २४ धावा दिल्या होत्या आणि दोन विकेट्सही घेतल्या होत्या. हरभजनला नुकतेच काही दिवसांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी खेळताना पाहिले गेले होते. तसेच तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समालोचकाची भूमिका पार पाडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस उतरला राजकारणाच्या मैदानात, तृणमूल काँग्रेस पक्षात केला प्रवेश
धोनीनं दिली ‘या’ खेळाडूची गॅरंटी, अन्यथा बीसीसीआय पाठवणार होती घरी! पण तोच बनलाय संघाची डोकेदुखी
लाईव्ह पत्रकार परिषदेत वॉर्नर उचलणार होता मोठे पाऊल, पण मॅनेजमेंटने त्वरित अडवले; पाहा व्हिडिओ