भारतात सध्या कोरोना संक्रमणाने रौद्ररूप धारण केले आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट असून दैनंदिन रुग्णवाढ तब्बल तीन लाखांच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे सगळीकडे भयग्रस्त वातावरण आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून निर्बंध लादले जात असून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी लोकांना घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र याही परिस्थितीत भारतात आयपीएल खेळवली जात आहे. ज्यावर अनेकांनी टीका केली आहे. यात भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने पण उडी घेतली आहे. त्याने आयपीएल आयोजनावर सडकून टीका केली आहे.
आयपीएल आयोजनावर संतापला अभिनव बिंद्रा
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना देखील आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. हे सामने बायो बबल मध्ये खेळवले जात असले तरी सध्याची परिस्थिती बघता आयपीएल रद्द करायला हवी असा मतप्रवाह देशात आहे. अभिनव बिंद्राने देखील याच प्रकारचे मत मांडले आहे. त्याने एका इंग्रजी वृत्तपत्रातील आपल्या कॉलममध्ये आयपीएलवर सडकून टीका केली आहे.
अभिनव म्हणाला, “देशात जे घडते आहे त्याबाबत खेळाडू आणि अधिकारी आंधळे झाले आहेत का? खेळाडू आपले संपूर्ण आयुष्य बायो बबल मध्ये नाही व्यतीत करू शकत. एका बाजूला देशात कोरोनामुळे कित्येक लोक आपला जीव गमावत आहेत आणि दुसरीकडे आयपीएल मधील विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. आपल्याला समाजाप्रति संवेदनशील असणे गरजेचे आहे.”
दरम्यान, कोरोना भयामुळे काही खेळाडूंनी आयपीएल मधून माघार घेणे इष्ट समजले आहे. आत्तापर्यंत ४ खेळाडूंनी कोरोनामुळे आयपीएल मधून माघार घेतली आहे. मात्र असे असले तरी आयपीएलच्या नियोजित कार्यक्रमात बदल होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये बाबर आझमचा मोठा विश्वविक्रम; विराट कोहलीला मागे टाकत या यादीत अव्वल
PBKS vs KKR Live: कोलकाताच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी, पंजाबला २० षटकात १२३ धावांवर रोखले
दुसर्या संघांकडून आता लोनवर खेळाडू घेणार राजस्थानचा संघ, वाचा कोणत्या नियमाचा होणार फायदा