भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंड संघाला ३-० ने पराभूत केले आणि मालिका आपल्या नावावर केली होती. आता २५ नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्कवर पार पडणार आहे. काय असू शकते या सामन्यासाठी दोन्ही संघांची रणनिती? कुठल्या गोलंदाजांना या खेळपट्टीवर जास्त मदत मिळू शकते? याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीनपार्कवर पार पडणार आहे. ग्रीनपार्कचा इतिहास पाहिला तर, या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असते. त्यामुळे दोन्ही संघ जेव्हा या सामन्यासाठी रणनिती आखतील, त्यावेळी फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्याबाबत नक्की विचार करतील.
आतापर्यंत या मैदानावर जितके सामने झाले आहेत, त्यामध्ये फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. २०१६ मध्ये जेव्हा भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ग्रीनपार्क मैदानावर आमने सामने आले होते, त्यावेळी भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. यावेळी देखील भारतीय संघ फिरकी गोलंदाजांची तिकडी घेऊन मैदानात उतरू शकतो, तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाकडे अनुभवी वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे न्यूझीलंड संघाची रणनिती काय असेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पिच क्युरेटर शिव कुमार यांच्या मते, ग्रीनपार्कची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते. त्यानंतर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे तीनही फिरकी गोलंदाज खेळताना दिसून येऊ शकतात. तर चौथा गोलंदाज म्हणून जयंत यादवला देखील संधी देण्यात आली आहे.
संघातील वेगवान गोलंदाजी फळीत इंशात शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज आहेत. प्रसिद्ध कृष्णाचा चौथा वेगवान गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
कानपूर कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
कानपूर कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंड संघ –
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), काईल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, विल सोमरविल, टिम साऊथी, रॉस टेलर, नील वॅगनर, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपक चाहरचा ९५ मीटर लांब षटकार पाहून कर्णधार रोहितही चकीत; दिली अशी रिॲक्शन
अबूधाबी टी१० लीगमध्ये इंग्लिश फलंदाजाचा बोलबाला, सलग ४ षटकारांसह एका षटकात निघाल्या ३५ धावा
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका