आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. भारतीय संघाने सराव सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले होते. परंतु सुपर१२ फेरीतील पहिल्याच लढतीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीला विश्वास आहे की, भारतीय खेळाडू आगामी सामन्यात पुनरागमन करतील. भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. असे ब्रेट लीचे म्हणणे आहे.
ब्रेट लीने एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “भारतीय संघाला ३ फिरकी गोलंदाज खेळवता आले असते. तर, भुवनेश्वर आणि मोहम्मद शमी हे देखील उच्च दर्जाचे गोलंदाज आहेत. जर हे गोलंदाज अपयशी ठरले तर दुसर कोण असेल? त्यांच्याकडे योग्य संघ होता. परंतु पाकिस्तान संघाला देखील श्रेय द्यावे लागेल. कारण त्यांनी अप्रतिम प्रदर्शन केले. भारतीय संघाकडून एकमेव विराट कोहली होता ज्याने अर्धशतक झळकावले.”
तसेच तो केएल राहुल बाबत बोलताना तो म्हणाला की, “केएल राहुल या सामन्यात अपयशी ठरला. असे होत असते. याचे खरे कारण म्हणजे आता त्याला अतिरिक्त गतीचा सामना करावा लागतोय. पाकिस्तानी गोलंदाजांना खेळपट्टीतून जास्त गस्ती मिळत आहे. परंतु माझ्यासाठी अजुनही भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे.”
तसेच दबाव कमी करण्याचा सल्ला देत ब्रेट ली म्हणाला की, “विश्रांती घ्या आणि सर्व काही ठीक होईल. जर त्यांना त्यांच्या क्षमतेवर आणि प्रतिभेवर विश्वास असेल तर ते चांगलेच होईल. कदाचित यावेळी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल.”