भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्यात रिषभ पंतचा मोलाचा वाटा होता. अशातच भारतीय संघाच्या अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रिषभ पंतबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघासाठी २६ कसोटी सामने आणि ९४ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला असे वाटते की, जेव्हापासून रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून अनेकदा त्याने दबावात देखील उत्कृष्ट खेळी केली आहे. मग तो विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना असो किंवा आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना. मुख्य बाब ही आहे की, त्याने वैयक्तिकरित्या खुप चांगली कामगिरी केली आहे. मला असे वाटते की, तो असा खेळाडू आहे, जो नेहमी संधीच्या प्रतीक्षेत असतो. त्याने आयपीएलच्या अंतिम सामन्यात देखील अर्धशतक झळकावले होते.”
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “मला याबाबत कुठलीही शंका नाही की, तो भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे. रिषभ पंत तो खेळाडू आहे, जो १०० कसोटी सामने खेळू शकतो. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला आठवण आहे की, काही वर्षांपूर्वी त्याने स्वबळावर दिल्ली संघाला सामना जिंकून दिला होता. माझ्या मते तो एलिमिनेटरचा सामना होता. अनेकदा त्याने कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढायचे काम केले आहे. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.”
रिषभ पंतला इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत भारतीय श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने ही भूमिका देखील योग्यरीत्या पार पडली होती. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल २०२१ स्थगित होण्यापुर्वी गुणतालिकेत पहिल्यास्थानी विराजमान आहे.
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी
इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी अनिर्णित राखण्यास यशस्वी, पण आयसीसीने केली ‘ही’ मोठी कारवाई