बर्मिंघम| इंग्लंडमध्ये सध्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा थरार सुरू आहे. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच उतरले असून साखळी फेरी सामन्यानंतर आता शनिवारपासून (०६ ऑगस्ट) त्यांच्या उपांत्य फेरी सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी दुपारी ३.३० वाजता पहिला उपांत्य सामना होणार आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी राहिला, तर त्यांचे रौप्य पदक निश्चित होईल. अशात या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
बार्बाडोसविरुद्धच्या ‘करा अथवा मरा’ सामन्यात भारतीय संघ मजबूत प्लेइंग इलेव्हनसह (Indian Playing Xi) मैदानात उतरला होता. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ बदल केले होते. हे दोन्ही बदल भारतीय संघासाठी फायदेशीर ठरले होते. यष्टीरक्षक यस्तिका भाटियाच्या जागी तानिया भाटियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली गेली होती. तर कोविड-१९ वर मात करून आल्यानंतर वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकार हिला सब्बिनेनी मेघनाच्या जागी अंतिम एकादशमध्ये सहभागी केले गेले होते.
पूजा (Pooja Vastrakar) कॉमनवेल्थ गेम्सची (Commonwealth Games 2022) सुरुवात होण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तिला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर भारतीय संघाला तिची फारच कमतरता जाणवली होती. बार्बाडोसविरुद्ध तिला एकही विकेट घेता आली नव्हती. मात्र तिने फेकलेल्या २ षटकात फक्त ७ धावा खर्च करत संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता. अशात इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधील तिचे स्थान निश्चित असेल.
मात्र यष्टीरक्षक तानिया भाटियाचे प्रदर्शन सरासरी राहिले होते. अशात तिच्याजागी पुन्हा एकदा यस्तिका भाटियाला आजमावले जाऊ शकते. तसेच फलंदाज जेमिमाह रोड्रिगेज हीदेखील लयीत परतली आहे. तर रेणुका सिंग पहिल्या सामन्यापासून आपल्या गोलंदाजीची धार दाखवत आहे. त्यामुळे या खेळाडू इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतात.
उपांत्य सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
शेफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, जेमिमाह रोड्रिगेज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गोल्ड जिंकूनच परतायचं! मोठ्या बदलांसह उपांत्य सामन्यात उतरणार भारत, प्रशिक्षकांनी दिलेत संकेत
BREAKING: बजरंगाची पुन्हा कमाल! मारली कॉमनवेल्थ मेडलची हॅट्रिक