---Advertisement---

पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता-फेडरोव्ह यांच्यातील रंगतदार लढत अनिर्णित

On: शुक्रवार, जुलै 3, 2026 7:05 PM
---Advertisement---


बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीने आणि ‘द हॅबिटॅट’द्वारे प्रायोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता व बेलारुसचा ग्रँडमास्टर फेडरोव्ह अलेक्सी यांच्यातील चौथ्या फेरीतील चुरशीची लढत अखेर अनिर्णित राहिली. अभिजीत गुप्ता याने 3 गुणांसह चौथ्या फेरीअखेर गुण तालिकेत आघाडीचे स्थान कायम राखले आहे. तर, भारताचा अद्विक अगरवाल व अमेरिकेचा वैद्यनाथन कन्नन हे अनुक्रमे 2.5 गुणांसह संयुक्त दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मुंडवा येथे ‘द फेर्न हॅबिटॅट’ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन चौथ्या फेरीतील आज झालेल्या अभिजीत गुप्ता विरुद्धच्या लढतीत फेडरोव्हने ओल्ड इंडियन डिफेन्स प्रकारच्या बचावाने डावाची सुरुवात केली. मात्र, अभिजीत याने सातत्याने पटावरील मोहऱ्यांच्या रचनेत आपले वर्चस्व कायम राखले. फेडरोव्हला खऱ्या अर्थाने या डावात वरचढ करता आले नाही. डावाच्या उत्तरार्धात अभिजीत याने दोन प्याद्यांच्या बदल्यात महत्वाच्या मोहऱ्याचा बळी मिळवला. त्यामुळे त्याला विजयाची संधी प्राप्त झाली होती. मात्र, या प्रयत्नांत वेळ कमी उरल्यामुळे अभिजीतला झटपट चाली करण्याच्या प्रयत्नात हि संधी गमवावी लागली. परिणामी निर्णायक विजयाची संधी असतानाही त्याला अखेरीस बरोबरीत समाधान मानावे लागले.

आजच्या चौथ्या फेरीच्या दोन निकाली लढतींमध्ये बेलारूसच्या ग्रँडमास्टर अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेजने अमेरिकेच्या वैद्यनाथन कन्ननचा पराभव केला व 1 गुणांची कमाई केली. भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वथ एस याने भारताच्या नितीश बेलुरकरवर विजय मिळवत 1 गुण मिळवला. आंतरराष्ट्रीय मास्टर कुशाग्र मोहन विरुद्ध अक्षय बोरगावकर या भारतीय खेळाडूंमधील लढत बरोबरीत सुटली. तसेच, भारताच्या फिडे मास्टर अद्विक अगरवाल याने श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय मास्टर डिसिल्वा एलएमएसटी याला बरोबरीत रोखले.

या स्पर्धेतून पाच आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडूंना ग्रँडमास्टर किताबाचा नॉर्म मिळवण्याची संधी आहे. तर, दोन फिडे मास्टर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा नॉर्म मिळवणायची संधी आहे. यापैकी नितीश बेलुरकर, कुशाग्र मोहन आणि अश्वथ एस या खेळाडूंना ग्रँडमास्टर नॉर्म साठी 9 पैकी 7 गुणांची गरज आहे. तर, अक्षय बोरगावकर व डिसिल्वा एलएमएसटी याना 9 पैकी 6.5 गुणांची गरज आहे.

याआधी चौथ्या फेरीचे उदघाटन ब्लेड्स ऑफ ग्लोरीचे संस्थापक, अमित इंटरप्रायझेस हाऊसिंग लिमिटेडचे संचालक व माजी क्रिकेटपटू रोहन पाटे, घई हॉटेल्स व इन्व्हेस्टमेंट्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक परमजित सिंग घई व बलराज घई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे आदी उपस्थित होते.

निकाल: राउंड रॉबिन चौथी फेरी:
कुशाग्र मोहन(0.5गुण)(भारत) बरोबरी वि.अक्षय बोरगावकर(0.5गुण)(भारत);
वैद्यनाथन कन्नन(0गुण)(अमेरिका)पराभूत वि.अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज(1गुण)(बेलारूस);
डिसिल्वा एलएमएसटी(0.5गुण)(श्रीलंका) बरोबरी वि.अद्विक अगरवाल(0.5गुण)(भारत);
अभिजीत गुप्ता(0.5गुण)(भारत) बरोबरी वि.फेडरोव्ह अलेक्सी(0.5गुण)(बेलारूस);
अश्वथ एस(1गुण)(भारत)वि.वि.नितीश बेलुरकर(0गुण)(भारत)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---