कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाला आहे. या सामन्याचा रविवारी चौथा दिवस होता. चौथ्या दिवसाखेर न्यूझीलंडने ४ षटकात १ बाद ४ धावा केल्या आहेत. अजून न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावांची गरज आहे, तर भारताला ९ विकेट्सची आवश्यकता आहे.
भारताने दुसरा डाव ८१ षटकांनंतर ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. याबरोबरच पहिल्या डावात घेतलेल्या ४९ धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर २८४ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचे सलामीवीर विल यंग आणि टॉम लॅथम मैदानात उतरले. मात्र, त्यांची जोडी फार काळ टिकली नाही. विल यंगला आर अश्विनने २ धावांवर पायचीत केले. तो बाद झाल्यानंतर विल्यम सोमरविल मैदानात उतरला. पण चौथ्या षटकानंतर न्यूझीलंडच्या ४ धावा झाल्या असताना दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
सहाचे ६ वे कसोटी अर्धशतक
दुसऱ्या सत्रात अर्धशतक करुन श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर वृद्धिमान सहाने फलंदाजीची जाबाबदारी हाती घेतली. त्याने अक्षर पटेलबरोबर नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत भारताला २०० धावांचा टप्पा पार करुन दिली. या दरम्यान सहाने ६ वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. भारताने ८१ षटकांनंतर ७ बाद २३४ धावांवर दुसरा डाव घोषित केला. यावेळी सहा ६१ धावांवर आणि अक्षर २८ धावांवर नाबाद खेळत होते.
न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि काईल जेमिसनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच एजाज पटेलने १ विकेट घेतली.
श्रेयस अय्यरचे अर्धशतक
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात नियमित अंतराने विकेट्स गमावल्यानंतर मात्र, श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने डाव सांभाळला होता. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र, त्यांची जोडी स्थिरवल्याचे वाटत असतानाच अश्विनला ३२ धावांवर ४० व्या षटकात काईल जेमिसनने त्रिफळाचीत केले.
पण, यानंतर वृद्धिमान साहाने देखील अय्यरची चांगली साथ दिली. अय्यरचे एक बाजू भक्कमपणे सांभाळताना ५६ व्या षटकात १०९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो कसोटी पदार्पणाच पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावातही ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
मात्र, अर्धशतक केल्यानंतर तो काहीवेळातच बाद झाला. त्याला टीम साऊथीने यष्टीरक्षक टॉम बंडेलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने १२५ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याने सहाबरोबर देखील अर्धशतकी भागीदारी केली.
भारताने दुसऱ्या सत्राखेरपर्यंत दुसऱ्या डावात ६०.२ षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या. भारताकडे २१६ धावांची आघाडी आहे. सहा २२ धावांवर नाबाद आहे.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे वर्चस्व
चौथ्या दिवसाची सुरुवात भारताने दुसऱ्या डावातील ६ व्या षटकापासून आणि १ बाद १४ धावांपासून केली. भारताकडून तिसऱ्या दिवसाखेर नाबाद परतलेले मयंक अगरवालने ४ धावांपासून आणि चेतेश्वर पुजाराने ९ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली यांनी चौथ्या दिवशी डावाची सुरुवात केली.
मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले. १२ व्या षटकात पुजाराला काईल जेमिसनने यष्टीरक्षक टॉम बंडेलकडे झेल देण्यास भाग पाडले. पुजारा २२ धावा करुन बाद झाला. पाठोपाठ अजिंक्य रहाणेला १५ व्या षटकात अजाज पटेलने पायचीत करत केवळ ४ धावांवर माघारी धाडले.
डावाच्या २० व्या षटकात टीम साऊथीने दुहेरी धक्के दिले. त्याने मयंक अगरवालला १७ धावांवर बाद केले, रविंद्र जडेजाही फार काही करु शकला नाही. त्याला टीम साऊथीने शुन्यावर बाद केले. त्यामुळे भारताचा अर्धा संघ ५१ धावांतच माघारी परतला होता.
पण, यानंतर आर अश्विनने श्रेयस अय्यरची चांगली साथ देताना भारताचा डाव सावरला. यावेळ एक बाजू अय्यरने सांभाळली असताना आर अश्विनने काही आक्रमक फटके खेळले. या दोघांनी आणखी पडझड होऊ न देता दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत भारताला दुसऱ्या डावात ३२ षटकात ५ बाद ८४ धावा केल्या. यावेळी श्रेयस अय्यर १८ धावांवर आणि आर अश्विन २० धावांवर नाबाद खेळत आहे.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३४५ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यामुळे भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली.