इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात त्यांना भारताविरुद्ध ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेने सुरुवात होईल. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्या चेन्नईमध्ये आहे.
चेपॉक नावाने प्रसिद्ध चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे, तर दुसरा सामना १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे.
चेन्नई नेहमीच भारतीय संघासाठी खास मैदान राहिले आहे. अनेक अविस्मरणीय कसोटी विजय भारताने चेन्नईत मिळवले आहेत. या लेखातही आपण चेन्नई कसोटीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ.
भारताचे चेन्नईच्या मैदानातील एकूण सामने –
भारताने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण ३२ सामने खेळले आहेत. त्यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. तर ६ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागाला आहे. याशिवाय ११ सामना अनिर्णित राहिले आहेत. चेन्नई येथे मागील १३ वर्षात ३ कसोटी सामने भारताने खेळले आहेत. त्यातील २ इंग्लंडविरुद्ध तर १ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
इंग्लंडविरुद्धचे चेन्नईच्या मैदानातील सामने –
भारताने चेन्नईमध्ये खेळलेल्या एकूण ३२ सामन्यांपैकी ९ सामने इंग्लंड संघाविरुद्ध खेळले आहेत. त्यातील ५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात इंग्लंड संघ विजयी झाला आहे. तसेच १ सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध मिळवलेले तिन्ही विजय हे १९९० सालाच्या आधीचे आहेत. त्यानंतर इंग्लंडला चेन्नईमध्ये विजय मिळवता आलेला नाही.
चेन्नईत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
भारत आणि इंग्लंड संघांत चेन्नई येथे झालेल्या सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ३०५ धावा या मैदानावर केल्या आहेत. तर एकूण सामन्यांचा विचार करायचा झाल्यास भारताकडून चेन्नईच्या मैदानात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा लिटील मास्टर सुनील गावसकरांच्या नावावर आहेत. त्यांनी चेन्नईमध्ये १२ कसोटी सामन्यांतील २१ डावात १०१८ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ३ शतकांचा आणि ३ अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच त्यांनी याच मैदानात नाबाद २३६ धावांची खेळीही केली होती. इंग्लंडकडून या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माईक गटींग यांच्या नावावर आहे. त्यांनी ३ सामन्यांत २३८ धावा केल्या होत्या.
चेन्नईत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
भारत आणि इंग्लंड संघांत चेन्नई येथे झालेल्या सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भागवत चंद्रशेखर, विनू मंकड आणि इरापल्ली प्रसन्ना या तीन गोलंदाजांमध्ये विभागून आहे. या तिघांनीही या मैदानाच इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी १२ विकेट्स घेतल्या आहे. तसेच एकूण विचार करायचा झाल्यास भारताकडून चेन्नईच्या मैदानात सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळेने घेतले आहेत. कुंबळेने ४८ विकेट्स या मैदानात घेतले आहेत. तसेच इंग्लंडकडून या मैदानात सर्वाधिक विकेट्स निल फोस्टर यांनी घेतले असून त्यांनी ११ विकेट्स या मैदानात घेतल्या होत्या.
चेन्नईत सर्वोच्च धावा करणारा फलंदाज –
चेपॉक स्टेडियमवर सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत करुण नायर अव्वल क्रमांकावर आहे. त्याने २०१६ साली चेन्नई कसोटीत नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. त्याने हे त्रिशतक ३८१ चेंडूत पूर्ण केले होते. हे त्रिशतक भारताच्या पहिल्या डावात त्याने केले होते. त्यावेळी तो कसोटीत भारताकडून त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवागनंतरचा दुसराच क्रिकेटपटू बनला होता.
चेन्नईत सर्वोत्तम गोलंदाजी –
चेपॉक स्टेडियमवर गोलंदाजीमध्ये सर्वात्तम कामगिरी केली आहे ती फिरकीपटू नरेंद्र हिरवानी आणि हरभजन सिंगने. हिरवानी यांनी जानेवारी १९८८ साली वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या डावात ८ आणि दुसऱ्या डावात ८ अशा मिळून एकूण १६ विकेट्स काढल्या होत्या. तर हरभजन सिंगने २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण १५ विकेट्स सामन्यांत घेतल्या होत्या.
भारताचे इंग्लंडविरुद्ध चेन्नईतील मागील १३ वर्षातील विजय –
भारताने गेल्या १३ वर्षांत इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये २००८ आणि २०१६ साली कसोटी सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. २००८ साली झालेल्या कसोटी सामन्यात तर भारताने ३८७ धावांचे आव्हान चौथ्या डावात पार करण्याची करामत केली होती. तर २०१६ साली करुण नायरच्या त्रिशतकामुळे आणि केएल राहुलने केलेल्या १९९ धावांच्या खेळीमुळे भारताने १ डाव आणि ७५ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
खराब फॉर्मातून सावरण्यासाठी ‘ही’ गोष्ट करतो, कुलदीप यादवने केला उलगडा
आता ‘या’ स्पर्धेत खेळणार अर्जुन तेंडुलकर, झाला मुंबई संघात समावेश
“तो जगातील सर्वोत्तम व्यक्ती”, ताहीरने केले ‘या’ भारतीय खेळाडूचे कौतुक