भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३८ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवताच भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका खिशात घातली. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम रचले गेले. तो कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत विरोधी संघाला व्हाईटवॉश देणारा भारतीय संघाचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने ट्रॉफी उंचावली. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. यादरम्यानचा सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
चालवली एमएस धोनीची परंपरा
ज्याप्रकारे एमएस धोनी सामना खिशात घातल्यानंतर सामन्याची ट्रॉफी युवा खेळाडूंच्या हातात ट्रॉफी द्यायचा. त्याचप्रकारे रोहित शर्माने ही परंपरा पुढे चालवली. त्याने या सामन्यानंतर युवा खेळाडू प्रियांक पांचाळकडे ट्रॉफी सोपवली. फोटो सेशनमध्येही प्रियांक ट्रॉफी हातात धरलेला दिसत आहे. तसेच, संघातील बाकीचे खेळाडू त्याच्याभोवती उभे आहेत. प्रियांक श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅकअप सलामीवीर म्हणून संघासोबत होता. याआधी, प्रियांक भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही संघासोबत होता. त्यानंतर दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी सलामीवीर म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताकडून त्याला अद्याप पदार्पण करता आलेले नाही. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
CHAMPIONS #TeamIndia @Paytm #INDvSL pic.twitter.com/GhLlAl1H0W
— BCCI (@BCCI) March 14, 2022
भारताने २३८ धावांनी जिंकला दुसरा कसोटी सामना
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम कसोटीत २३८ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातली. श्रीलंका संघ दुसऱ्या डावात २०८ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने एकाकी झुंज देत १०७ धावा कुटल्या. कर्णधाराव्यतिरिक्त कुशल मेंडिसने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. मात्र, या दोघांव्यतिरिक्त एकाही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही आणि श्रीलंका संघाने १० विकेट्स गमावत २०८ धावांवरच नांगी टाकली. यावेळी भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह ३, अक्षर पटेल २ आणि रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये फायदा
श्रीलंकेवरील या विजयामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्येही खूप मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ आता एका स्थानाने वर म्हणजेच चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी भारत पाचव्या स्थानावर होता, परंतु श्रीलंकेला २-० ने क्लीन स्वीप दिल्यानंतर भारताचे १२ गुण झाले आहेत आणि विजयाची सरासरी ५८.३३ वर गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय नवीन! इंग्लंडची फलंदाज गर्रकन फिरली अन् उलटा शॉट मारत झाली आऊट; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी
‘असा’ नकोसा विक्रम कुणाच्याही नावावर नको! महिला विश्वचषकात पराभवाच्या बाबतीत पाकिस्तानने कापलं नाक