भारत-पाकिस्तान संघ जरी पारंपारिक प्रतिस्पर्धी असले तरी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचे त्याच्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे अनेक भारतीय खेळांडूंशी चांगले संबंध आहेत.
त्याच्या याच मैत्रीबद्दल भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने ‘व्हॉट द डक’ या शोमध्ये एक मजेदार किस्सा सांगितला आहे.
बंगळूरूला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील हा किस्सा आहे. त्यावेळी इंझमाम पाकिस्तानचा कर्णधार होता आणि दानिश कानेरिया गोलंदाजी करत होता, तर सेहवाग फलंदाजी करत होता.
हा किस्सा सांगताना सेहवाग म्हणाला,” मला वाटते आम्ही बंगळूरूला कसोटी सामना खेळत होतो. मी त्या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये होतो. मी पहिल्या डावात 201 धावा केल्या होत्या. मी जेव्हा फलंदाजी करत होतो तेव्हा इंझमाम उल हक स्लीपमध्ये उभा होता आणि कमरान अकमल यष्टीरक्षण करत होता. ”
“बराच काळ फलंदाजी चालू असल्याने लाँग आॅफ, लाँग आॅन आणि मिड विकेटला लावलेले क्षेत्ररक्षण तसेच होते. कानेरिया सतत पॅडवर गोलंदाजी करत होता. त्यामुळे मी इंझीला सांगितले, लाँग आॅनच्या क्षेत्ररक्षकाला थोडे पुढे यायला सांग. यावर त्याने मला विचारले का? त्यावर मी त्याला सांगितले, मला षटकार मारायचा आहे.”
पुढे सेहवाग म्हणाला, “तो (इंझमाम) हसला आणि म्हणाला तू गंमत करतोय. त्यावर मी त्याला म्हटलं नाही. त्या क्षेत्ररक्षकाला पुढे बोलव. जर मी षटकार नाही मारला तर त्याला परत मागे पाठव. त्यामुळे त्याने लाँग आॅनच्या क्षेत्ररक्षकाला मिड आॅनला यायला सांगितले. कानेरियाने चेंडू टाकला आणि मी त्यावर षटकार मारला. त्यानंतर त्याने पून्हा त्या क्षेत्ररक्षकाला मागे पाठवले.”
“यामुळे कानेरिया चिडला. त्याने इंझीला विचारले त्या क्षेत्ररक्षकाला पुढे का बोलावले. त्याने (इंझमाम) कानेरियाला उत्तर दिले तू फक्त गोलंदाजी कर.”
थोडेसे इंझमाम उल हकबद्दल:
इंझमाम हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून तो पाकिस्तानच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. तसेच तो वनडेमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. याचबरोबर कसोटीमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करण्यामध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याने वनडेमध्ये 378 सामन्यात 39.52 च्या सरासरीने 11739 धावा केल्या आहेत. तर कसोटीत 120 सामन्यात 49.60 च्या सरासरीने 8830 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
–२१ वर्षीय क्रिकेटपटूचा सरावादरम्यान दुर्दैवी मृत्यु
–तो एक ट्विट रशीद खानला पडला भलताच महाग
–एकाच दिवशी ३ दुबळ्या संघांनी ३ दिग्गज संघांना चारली पराभवाची धूळ
–ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघाचे बेंगलोर शहरात आगमन