आयपीएल २०२०मधील साखळी फेरीचे शेवटचे २ सामने उरले आहेत. परंतु अजूनही प्लेऑफचे चित्र स्पष्ट झालेले नाही. केवळ मुंबई इंडियन्सने प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे प्लेऑफमधील उर्वरित ३ जागांसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या ४ संघात स्पर्धा आहे. या ४ संघांसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कशी समीकरणे असतील, याबद्दल आढावा घेऊ.
कोलकाता नाईट रायडर्स – 14 सामने ७ विजय, ७ पराभव – १४ गुण
प्लेऑफच्या शर्यतीत सध्या असलेल्या ४ संघांपैकी केवळ कोलकाता नाईट रायडर्स असा संघ आहे ज्यांचे सर्व साखळी फेरीतील सामने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते अन्य संघांच्या निकालावर अवलंबून आहेत.
सोमवारी(२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यात बेंगलोरचा संघ २२ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला, किंवा दिल्लीचा संघ १८ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला तरच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकतो.
या दोन्ही शक्यतांव्यतिरीक्त सामन्याचा निकाल अखेरच्या षटकांत लागला तर दिल्ली आणि बेंगलोर हे दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतील. असं झाल्यास यानंतर कोलकाताला ३ तारखेच्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादवर मात करण गरजेचं ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १३ सामने, ७ विजय, ६ पराभव, – १४ गुण
बेंगलोरचा साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सोमवारी(२ नोव्हेंबर) होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो १६ गुणांसह प्लेऑफमध्ये जागा पक्की करेल.
मात्र, जर बेंगलोर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाले तर त्यांना हैदराबाद पराभूत होण्याची आशा करावी लागेल. या सामन्यात जर हैदराबाद हारले तर बेंगलोर १४ गुणांसह देखील प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करतील.
पण जर हैदराबाद जिंकले तर मात्र त्यांना नेटरनरेटच्या आधारावर प्लेऑफमध्ये प्रवेश करावा लागेल. त्यांना दिल्लीविरुद्ध मोठा पराभव स्विकारुन चालणार नाही. कारण आधीच हैदराबादचा नेटरनरेट १४ गुण मिळवू शकणाऱ्या सर्व संघांत जास्त आहे. त्यामुळे बेंगलोरला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर त्यांनी दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि १६० धावा केल्या तर दिल्ली या धावांचा पाठलाग करण्यासाठी कमीतकमी १७.३ षटकांचा कालावधी घेईल. तसेच जर त्यांनी आधी गोलंदाजी केली, तर त्यांना हा सामना २१ किंवा कमी धावांनी पराभूत व्हावे लागेल. तरच ते नेटरनरेटच्या आधारावर प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतील.
दिल्ली कॅपिटल्स – १३ सामने, ७ विजय, ६ पराभव, – १४ गुण
दिल्लीसाठीही बेंगलोर प्रमाणेच जवळपास समीकरणे आहेत. सोमवारी बेंगलोरविरुद्ध विजय मिळवून दिल्ली प्लेऑफमधील स्थान पक्के करु शकतात. पण जर दिल्लीला बेंगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना आशा करावी लागेल की मंगळवारी(३ नोव्हेंबर) होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद सामन्यात हैदराबाद पराभूत व्हावा. या सामन्यात जर हैदराबाद हारले तर दिल्ली १४ गुणांसह देखील प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करतील.
पण जर हैदराबाद जिंकले तर मात्र दिल्लीलाही नेटरनरेटच्या आधारावर प्लेऑफमध्ये प्रवेश करावा लागेल. त्यांना बेंगलोरविरुद्ध मोठा पराभव स्विकारुन चालणार नाही. तसेच त्यांना हैदराबाद आणि कोलकाताच्या नेटरनरेटचाही विचार करावा लागेल.
त्यामुळे दिल्लीला या गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल की त्यांनी जरी प्रथम फलंदाजी केली आणि समजा त्यांनी १६० धावा केल्या तर बेंगलोर १८ पेक्षा कमी षटकात हे आव्हान पूर्ण करणार नाही. तसेच जर दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली तर त्यांना १८ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी पराभूत व्हावे लागेल.
सनरायझर्स हैदराबाद – १३ सामने, ६ विजय, ७ पराभव – १२ गुण
सनरायझर्स हैदराबादचा साखळी फेरीतील शेवटचा सामना गुणतालिकेतील अव्वल क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. हैदराबाद समोरील समीकरण अगदी सोपे आहे, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल.
जर हा विजय मिळवला तर ते प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करतील. कारण हैदराबादचा नेटरनरेट १४ गुण असणाऱ्या सर्व संघांमध्ये सर्वाधिक आहे. मात्र या सामन्यात पराभव झाला तर हैदराबादसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे सर्व दरवाजे बंद होतील आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावे लागेल.
या आयपीएल२०२० मधील ५० व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल-
१- मुंबई इंडियन्स: (सामने १३, विजय ९, पराभव ४, गुण १८, नेट रन रेट +१.२९६)
२- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने १३, विजय ७, पराभव ६, गुण १४, नेट रन रेट -०.१४५)
३- दिल्ली कॅपिटल्स : (सामने १३, विजय ७, पराभव ६, गुण १४, नेट रन रेट -०.१५९)
४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने १४, विजय ७, पराभव ७, गुण १४, नेट रन रेट -०.२१४)
५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने १३, विजय ६, पराभव ७, गुण १२, नेट रन रेट +०.५५५)
६- किंग्स XI पंजाब : (सामने १३, विजय ६, पराभव ८, गुण १२, नेट रन रेट -०.१६२)
७- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने १४, विजय ६, पराभव ८, गुण १२, नेट रन रेट -०.४५५)
८- राजस्थान रॉयल्स : (सामने १४, विजय ६, पराभव ८, गुण १२, नेट रन रेट -०.५५९)
महत्त्वाच्या बातम्या –
‘पंतने विराटकडून काही तरी शिकायला पाहिजे,’ माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची खोचक टिका
‘मी रिटायर होतेय’ अशा ट्विटने सिंधू चाहते गोंधळले, पाहा काय आहे प्रकरण
नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ