---Advertisement---

IPL 2020: मुंबई आणि बेंगलोर येणार आमने सामने; जिंकणारा संघ गाठणार प्लेऑफ

On: बुधवार, ऑक्टोबर 28, 2020 9:03 AM
---Advertisement---

आयपीएल २०२० चा ४८ वा सामना बुधवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतींमुळे सलग तिसऱ्या सामन्यात बाहेर राहण्याची शक्यता आहे. मुंबईला मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्सने पराभूत केले होते. ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून त्यांचे १४ गुण आहेत, तर बेंगलोर संघही रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभूत झाला असून तो गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांचेही १४ गुण आहेत. अशात मुंबई आणि बेंगलोर संघात प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी झुंज पाहायला मिळेल.

चर्चेत आहे रोहितची फीटनेस

रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. सोमवारी (२६ ऑक्टोबर) रोहित नेट्सवर सराव करताना दिसला. याचदिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती. मात्र यामध्ये रोहितची निवड करण्यात आली नव्हती. मुंबई इंडियन्स आणि बीसीसीआयकडून रोहितच्या फीटनेसबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेले नाही.

सौरभ तिवारी आणि इशान किशनवर विश्वास

रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईला सौरभ तिवारी आणि इशान किशनवर विश्वास ठेवावा लागेल. क्विंटन डी कॉक (३७४) राजस्थानविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अपयशी ठरला होता. तोदेखील या सामन्यात चांगली कामगिरी करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. किशन (२९८) आणि सूर्यकुमार यादव (२८३) यांनी आतापर्यंत या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्याव्यतिरिक्त प्रभारी कर्णधार कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्याही चांगली फटकेबाजी करू शकतात.

नवीन सुरुवात

मुंबईचे गोलंदाज मागील सामन्यातील पराभव विसरून नवीन सुरुवात करतील. मागील सामन्यात त्यांना राजस्थानच्या बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनसमोर मोठा संघर्ष करावा लागला होता. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी आतापर्यंत मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे. या दोघांनीही मिळून ३३ विकेट्स घेतल्या आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सला जेम्स पॅटिन्सन किंवा नेथन कुल्टर नाईलपैकी एकाला निवडावे लागेल.

नवदीप सैनीच्या दुखापतीबाबत बेंगलोर चिंतेत

बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहली (४१५) धावांसह आपला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ऍरॉन फिंच (२३६), युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल (३४३) आणि एबी डिविलियर्स (३२४) या फलंदाजांना सातत्य दाखवण्याची आवश्यकता आहे. जर बेंगलोरच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगले योगदान दिले, तर विरुद्ध संघ चिंतेत पडू शकतो. ख्रिस मॉरिस, मोईन अली आणि गुरकीरत मान हेदेखील मधल्या फळीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

परंतु बेंगलोर संघाचा धडाकेबाज गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त असल्यामुळे ते गोलंदाजी विभागाबाबत चिंतेत आहेत. सैनीच्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळण्याचे निश्चित नाही. जर तो खेळला नाही, तर ख्रिस मॉरिस आणि मोहम्मद सिराजव्यतिरिक्त इसरू उदानावरील जबाबदारीही वाढेल.

मुंबई आणि बेंगलोर संघातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० वाजता सुरू होईल.

असे आहेत दोन्ही संघ-

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, इशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेफरेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट

रॉयल चैलेंजर्स बेंगलोर
ऍरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डिविलियर्स, गुरकीरत सिंग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युझवेंद्र चहल, ऍडम झम्पा, इसरू उदाना, मोईन अली, जॉश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव

-काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---