दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीगमधील हाय वोल्टेज समजला जाणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामना शनिवारी (१ मे) झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या विजयात कायरन पोलार्डने मोलाचा वाटा उचलला.
अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २१८ धावा केल्या, तसेच मुंबई समोर विजयासाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी आक्रमक खेळताना ७ षटकातच ७० धावा धावफलकावर लावल्या होत्या. मात्र त्यांची ७१ धावांची भागीदारी शार्दुल ठाकूरने ८ व्या षटकातो तोडली. त्याने रोहितला ३५ धावांवर बाद केले. पाठोपाठ ९ व्या षटकात रवींद्र जडेजाने सूर्यकुमार यादवला केवळ ३ धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. तर १० व्या षटकात मोईन अलीने आपल्याच गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकला ३८ धावांवर झेलबाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला.
पण यानंतर कायरन पोलार्डने वादळी खेळी केली. त्याने कृणाल पंड्याला साथीला घेत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्या दोघांनी ८९ धावांची भागीदारी केली. पण अखेर ही भागीदारी सॅम करनने कृणालला बाद करत तोडली कृणालने ३२ धावा केल्या. त्यानंतर हार्दिकही करनच्या गोलंदाजीवर १९ व्या षटकात ७ चेंडूत १६ धावा करुन बाद झाला. अखेर पोलार्डने नाबाद ८७ धावा केल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिला. पोलार्डने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकार मारत ही खेळी केली.
चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा आणि मोईन अलीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
अली, डू प्लेसिस, रायूडूची अर्धशतके
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने डावाची सुरुवात केली. मात्र, ऋतुराज पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळताना ४ धावा करुन बाद झाला. पण त्यानंतर डू प्लेसिसला मोईन अलीने भक्कम साथ देताना शतकी भागीदारी रचली. या दोघांनीही काही आक्रमक फटके खेळताना चेन्नईचा डाव पुढे नेला. दरम्यान, १० व्या षटकात डू प्लेसिस धावबाद होता होता थोडक्यात बचावला.
मात्र, अखेर या दोघांची भागीदारी जसप्रीत बुमराहने ११ व्या षटकात तोडली. त्याने मोईल अलीला ५८ धावांवर बाद केले. अलीने या खेळीदरम्यान ३६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात पोलार्डने चेन्नईला लागोपाठ दोन धक्के दिले. त्याने १२ व्या षटकात फाफ डू प्लेसिसला पाचव्या चेंडूवर ५० धावांवर आणि सुरेश रैनाला सहाव्या चेंडूवर २ धावांवर बाद केले.
त्यामुळे मैदानावर रवींद्र जडेजा आणि अंबाती रायडू ही नवीन जोडी उतरली. पण त्यांनी पुढे विकेट न जाऊ देता चेन्नईला २०० धावांचा टप्पा सहज पार करुन दिला. या दोघांनी नाबाद १०२ धावांची भागीदारी केली. या शतकी भागीदारीदरम्यान, जडेजा संयमी खेळताना रायडूला चांगली साथ देताना दिसला. रायडूने वादळी खेळी केली. त्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. तर जडेजा २२ धावांवर नाबाद राहिला.
मुंबईकडून पोलार्डने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ विकेट घेतली.
नाणेफेकीचा कौल मुंबईच्या पारड्यात
या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून जिमी निशाम मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण करत आहे. त्याला जयंत यादवऐवजी मुंबईच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे. तसेच धवल कुलकर्णीला नॅथन कुल्टर नाईल ऐवजी मुंबईच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबरच चेन्नईने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #CSK.
Follow the game here – https://t.co/NQjEDM2zGX #MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/4Dhook7aH7
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, दीपक चाहर.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जिमी निशाम, राहुल चाहर, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.