आयपीएल २०२२ च्या ९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी लढत झाली. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला, जो त्यांचा चालू हंगामातील सलग दुसरा विजय आहे. तर दुसरीकडे मुंबईला मात्र चालू हंगामातील सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, मुंबईचा सलामीवीर फलंदाज ईशान किशनने या सामन्यात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) या सामन्यात एकूण ४३ चेंडू खेळला आणि यामध्ये ५४ धावा केल्या. यादरम्यान ईशानच्या बॅटमधून ५ चौकार आणि १ षटकार निघाला. या अप्रतिम खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. पण त्याने टी-२० क्रिकेटमधील स्वतःच्या ३००० धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या.
युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. तो आयपीएलमध्ये झटपट खेळी करण्यासाठी ओळखला जातो, पण भारतीय संघात मात्र त्याचे स्थान अजूनही पक्के झालेले नाहीय.
https://twitter.com/mipaltan/status/1510243446706999298?s=20&t=JMeBLYH_mTI9YOAwkgfJ2w
ईशानव्यतिरिक्त या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी युवा तिलक वर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि ६१ धावांचे योगदान दिले. अष्टपैलू कायरन पोलार्डकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, पण शेवटच्या षटकांमध्ये तो देखील कमाल दाखवू शकला नाही. शेवटच्या ६ चेंडूत मुंबईला विजयासाठी २९ धावांची आवश्यकता होती. परंतु नवदीप सैनीने टाकलेल्या या षटकात फक्त ५ धावा खर्च केल्या गेल्या आणि पोलार्डची विकेटही घेतली गेली.
दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली होती आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स ८ विकेट्सच्या नुकसानावर मर्यादित २० षटकांमध्ये १७० धावा करू शकला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव असून पहिल्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सने धूळ चारली होती. तर दुसरीकडे राजस्थानने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स या बलाढ्य संघांना मात दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बटलरच्या वादळापुढे उडाली मुंबई, इशान-तिलकच्या झुंजार खेळी व्यर्थ; राजस्थानचा २३ धावांनी विजय
तोडफोड मंडळाचे नवे अध्यक्ष.! नव्या दमाच्या मुंबईकराचे वादळी अर्धशतक, मोडला इशानचा ‘मोठा’ विक्रम
सेफ हँड्स! पडीक्कलचा झेल रोहितसाठी ठरला विक्रमी, पूर्ण केले ट्वेंटी ट्वेंटीमधील ‘दीडशतक’






