आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग आहे. आयपीएल हा पॉवर हिटिंगचा खेळ मानला जोतो, ज्याठिकाणी मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजांना अधिक महत्त्व आहे. या स्पर्धेत अनेकदा २०० पेक्षा मोठे लक्ष्य असतानाही संघांनी ते गाठून विजय मिळवला आहे. आता याच पार्श्वभूमीवर पंजाब किंग्ज फ्रेंचायझीने इंग्लंडचे प्रथम श्रेणी खेळाडू जूलियन वुडला संघाचा पॉवर हिटिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. वुडची जबाबदारी पंजाब किंग्जच्या फलंदाजांना झटपट धावा बनवण्यासाठी तयार करणे असेल. ही नवीन जबाबदरी मिळाल्यानंतर जूलियन वुडने त्याची प्रतिक्रिया दिली.
क्रिकेटमध्ये फलंदाजी प्रशिक्षक असतो, पण पॉवर हिटिंग प्रशिक्षक हा प्रकार मात्र अलिकडेच दिसू लागला आहे. जवळपास १२ वर्षांपूर्वी जूलियन वुड (Julian Wood) आणि अमेरिकी बेसबॉल क्लब टेक्सस रेंजर्सचे मुख्य प्रशिक्षक यांची भेट झाले होती. तेव्हापासून वुडचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला. त्यावेळी नुकतीच टी-२० क्रिकेटची सुरुवात झाली होती आणि तेव्हाच या प्रकारातील पॉवर हिटिंगचे महत्व वुडला समजले होते.
पीटीआयसोबत बोलताना वुड म्हणाला की, “आता वेळ आली आहे की, सर्वसाधारण फलंदाजी प्रशिक्षकापेक्षा तज्ञ प्रशिक्षक संघात घेतले जावे, जसा मी आहे. संघांनीही ठरवले आहे की, हाच पुढचा मार्ग आहे. क्रिकेट नेहमीच पारंपारिक खेळ राहिला आहे आणि यामध्ये बदल होण्यासाठी वेळ लागतो. मी पाच वर्षांपूर्वी सांगितले होते की, टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी प्रशिक्षकाऐवजी हिटिंग प्रशिक्षकाची गरज आहे. आता त्याची सुरुवात झाली आहे.”
दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामात पंजाब किंग्ज संघाला नवीन कर्णधार देखील मिळणार आहे. सलामीवीर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा त्याच्या हातात सोपवली गेली आहे. मागच्या हंगामात पंजाबचे नेतृत्व करताना केएल राहुल आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.