आतापर्यंत ४ वेळा आयपीएल स्पर्धेचा किताब पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला शुक्रवारी (दि. २० मे) राजस्थान रॉयल्स संघाने ५ विकेट्सने मात दिली. या विजयामुळे त्यांनी गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स संघाला मागे टाकत थेट दुसरे स्थान गाठले. तसेच, प्लेऑफचे तिकीटही मिळवले. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने मोठी प्रतिक्रिया दिली.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना चेन्नईने ६ विकेट्स गमावत १५० धावा चोपल्या. मात्र, हे आव्हान राजस्थान रॉयल्स संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
राजस्थानच्या विजयानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला की, “आता चांगलं वाटत आहे. आम्ही साखळी फेरीत ज्याप्रकारे खेळलो, तो शानदार राहिला. आमचे अनेक सामने चांगले राहिले. यादरम्यान सर्व खेळाडूंनी सामने जिंकून दिले. माझा असा विश्वास आहे की, आम्ही या स्थानावर राहण्याचे हक्कदार आहोत.”
सॅमसनने यावेळी आर अश्विन (R Ashwin) याचीही प्रशंसा केली. अश्विनने आधी गोलंदाजी करताना एक विकेट घेतली आणि त्यानंतर नाबाद ४० धावांची विजयी खेळी केली. अश्विनबद्दल सॅमसन म्हणाला की, “अश्विनने आमच्यासाठी शानदार काम केले आहे. तो आमच्यासाठी दिग्गज अष्टपैलू बनला. त्याने हंगामापूर्वी फलंदाजीचा सरावही केला होता.”
सामन्याबद्दल बोलताना सॅमसन म्हणाला की, “खेळपट्टी चांगली आहे, हे समजणे गरजेचे होते. तसेच, ते शानदार खेळ खेळत होते. मोईन अलीने ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्याला रोखणे कठीण होते. धावा गेल्या, हेच मानून आम्ही पुढे जात होतो. आम्हाला माहिती होतं की, आम्ही आपल्या गोलंदाजांवर जबरदस्त पुनरागमनासाठी विश्वास ठेवू शकतो.”