नुकताच आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) पार पडला. या लिलावात १० फ्रॅंचायझींनी अनेक खेळाडूंना विकत घेण्यासाठी स्पर्धा केली आणि त्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी मोठ्या बोली लागल्या. मात्र, या लिलावात काही दिग्गज खेळाडूंना कोणत्याच फ्रॅंचायझींनी विकत घेतले नाही. या लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर देखील हे खेळाडू आयपीएल २०२२चा (IPL 2022) भाग बनू शकतात. या लेखात आपण अशाच काही ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.
१. सुरेश रैना
सुरेश रैनाला (Suresh Raina) ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखले जाते, पण यावर्षीच्या लिलावात त्याच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही. तो सीएसके संघासोबत सुरुवातीपासूनच होता. २०२२ मध्ये सीएसके संघाने त्याला कायम ठेवले नाही. तसेच, लिलावात सुद्धा त्याच्यावर संघाने त्याला खरेदी करण्यात फारसा रस दाखवला नाही. असे असले, तरीही रैना पुन्हा एकदा आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळू शकतो. लिलावात त्याने त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये एवढी ठेवली होती. मात्र, रैना सीएसके संघात मार्गदर्शक म्हणून समाविष्ट होऊ शकतो. तसेच, आयपीएल २०२२ मध्ये समलोचन देखील करताना दिसू शकतो.
२. ऍडम झम्पा
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाला (Adam Zampa) या लिलावात कोणत्याच फ्रॅंचायझीने विकत घेतले नाही. आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रातील कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन त्याने स्वत:ला लांब ठेवले होते. त्यानंतर २०२२ मध्ये कोणत्याच फ्रॅंचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्यानंतर त्याने प्रश्न उपस्थित केले होते. यंदा झम्पा त्याची मूळ किंमत २ कोटी एवढी ठेऊन लिलावात उतरला होता. कदाचित विदेशी फिरकीपटू स्पर्धेतून बाहेर पडले, तर झम्पाला पुनरागमन करण्याची मोठी संधी मिळू शकते.
३. मोइसेस हेनरिक्स
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मोइसेस हेनरिक्स (Moises Henriques) याच्यावर देखील आयपीएल २०२२ च्या लिलावात कोणत्याच फ्रॅंचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू सुद्धा आयपीएल २०२२मध्ये खेळताना दिसू शकतो. हेनरिक्सला एखाद्या खेळाडूच्या जागी बदली म्हणून खेळण्याची संधी मिळू शकते. क्रिकेटमध्ये वेगवान अष्टपैलूंची मागणी नेहमीच जास्त असते, त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये हा खेळाडू खेळताना दिसू शकतो.
४. ओएन माॅर्गन
या लिलावात ओएन माॅर्गनवर (Eoin Morgan) देखील कोणत्याच फ्रॅंचायझीने बोली लावली नाही. केकेआर संघाला २०२१ च्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत नेण्यास या खेळाडूचा मोठा वाटा होता. त्यानंतर केकेआर संघाने त्याला रिटेन केले नाही. आता त्याला पुन्हा आयपीएल खेळण्याची संधी मिळू शकते. आयपीएल २०२२ मध्ये एखाद्या विदेशी खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्या जागी ओएन माॅर्गनला संधी मिळू शकते.
५. धवल कुलकर्णी
आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंच्या यादीत धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) याचा देखील समावेश आहे. त्याने या लिलावात त्याची मूळ किंमत ७५ लाख ठेवली होती. या आयपीएलमध्ये त्याला संधा मिळू शकते. आयपीएल २०२२ मध्ये एखादा गोलंदाज जखमी झाल्यास धवलला संधी मिळू शकते.
आयपीएल २०२२ या स्पर्धेला मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात ११ खेळाडूंवर १० कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली. मुंबई इंडियन्सने खरेदी केलेल्या ईशान किशनवर लिलावात सर्वाधिक १४ कोटी एवढी बोली लागली. लिलावात अनेक अनकॅप्ड आणि तरुण खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रॅंचायझींनी रस दाखवला. असे असले, तरीही आता मैदानात कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?
…तर महिला विश्वचषकात ९ खेळाडूंसह देखील खेळवला जाणार सामना, आयसीसीने केला मोठा बदल
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’