टी 20 क्रिकेट हे फलंदाजांचं फॉरमॅट मानलं जातं. या फॉरमॅटमध्ये फलंदाज तुफान वेगानं धावा काढण्याचा प्रयत्न करतात. टी 20 क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी धावा वाचवणं खूप अवघड असतं. आयपीएलच्या इतिहासात असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी एकाच षटकात 36 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. परंतु काही असेही गोलंदाज आहेत ज्याच्या गोलंदाजीमुळे मोठमोठ्या फलंदाजांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटकं टाकणाऱ्या गोलंदाजाबद्दल.
आयपीएलच्या जवळपास 16 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या नावावर आहे, ज्यानं आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या 119 सामन्यांमध्ये तब्बल 14 निर्धाव षटकं टाकली होती. प्रवीण कुमारनं इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्सकडून खेळला. प्रवीण कुमारनं 2008 ते 2017 या कालावधीत आयपीएलमध्ये 119 सामने खेळले. या दरम्यान त्यानं 90 विकेट घेतल्या. प्रवीण कुमारनं 2018 साली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2017 मध्ये तो शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.
प्रवीण कुमारच्या नावे आयपीएलमध्ये इतर दिग्गज गोलंदाजांपेक्षा कमी बळी असले तरी त्याचा इकॉनॉमी रेट त्याला खूप खास गोलंदाज बनवतो. त्याच्या कारकिर्दीत त्यानं 7.73 च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली, जी टी 20 फॉरमॅटमध्ये खूप चांगली मानली जाते. प्रवीणचा स्विंग होणारा चेंडू भल्या-भल्या फलंदाजांना चकमा देण्यास सक्षम आहे.
सर्वाधिक निर्धाव षटकं टाकणाऱ्यांच्या यादीत दुसरं स्थान भुवनेश्वर कुमारचं आहे, ज्यानं आजपर्यंत 12 निर्धाव षटकं टाकली आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या ट्रेंट बोल्टनं 11 निर्धाव षटकं टाकली आहेत.
येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचं समालोचन पॅनेल जाहीर; सुनील गावसकर, रवी शास्त्रींसह अनेक दिग्गज घेणार हातात माईक
एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!
IPL 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाईल? लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआय निर्णय घेण्याची शक्यता