आयपीएल 2026 मध्ये आता खेळाडूंनंतर समालोचकांनाही बीसीसीआयने कडक इशारा दिला आहे. भ्रष्टाचारविरोधी नियमांची कठोर अंमलबजावणी करत बोर्डाने सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणाऱ्या खेळाडू, अधिकारी, टीम सदस्यांचे कुटुंबीय आणि ब्रॉडकास्टर्सवर कारवाई सुरू केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, समालोचन करणाऱ्या काही माजी क्रिकेटपटूंना सामन्यादरम्यान सुरक्षित क्षेत्रात (PMOA) व्हिडीओ शूट केल्यामुळे फटकारण्यात आले. एका माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला डगआउटजवळ व्हिडीओ बनवताना पकडण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रोखले. आता त्यांच्यावर कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी सुरू आहे. कारण आयपीएलच्या अधिकृत पोशाखात मैदानावर खासगी व्हिडीओ बनवण्यास बंदी आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि व्लॉगर्ससोबत खेळाडूंची वाढती जवळीक बोर्डासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे ‘हनी ट्रॅप’सारख्या घटनांचा धोका वाढू शकतो, अशी भीती बीसीसीआयने व्यक्त केली आहे.
खेळाडूंच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनाही इशारा देण्यात आला आहे. एका भारतीय खेळाडूला टीमच्या प्रवास आणि हॉटेलमधील माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले. काही फ्रँचायझींनी इन्फ्लुएंसर्सना टीमच्या आतपर्यंत प्रवेश दिल्याबद्दलही बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय खेळाडूंच्या कुटुंबीयांना आयपीएलदरम्यान फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यापासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर लगेच व्हिडीओ पोस्ट करत असल्याने नियमभंगाच्या घटना वाढल्या आहेत.
यापूर्वी एका भारतीय वेगवान गोलंदाजालाही पत्नीने बनवलेल्या टीम हॉटेलच्या व्हिडीओचे प्रमोशन केल्यामुळे चेतावणी देण्यात आली होती. अशा व्हिडीओमधून खेळाडू त्या दिवशी सामना खेळणार की नाही, याची माहितीही समोर येत असल्याची चिंता एंटी करप्शन युनिटने व्यक्त केली आहे.
तसेच वरिष्ठ खेळाडूंनी मित्र किंवा कुटुंबीयांना टीम बसमध्ये आणण्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. आता हे कडक नियम फक्त आयपीएलपुरते मर्यादित नसून राज्यांच्या स्थानिक टी-20 लीगमध्येही लागू करण्यात येणार आहेत, जेणेकरून युवा खेळाडूंसमोर चुकीचा आदर्श निर्माण होऊ नये.




