इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामाचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक आश्चर्यचकीत करणारे निर्णय फ्रँचायझींनी घेतल्याचे पाहायला मिळाले. अनेक युवा खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली, अनेक दिग्गज खेळाडूंमध्ये कोणीही पसंती दाखवली नसल्याचे दिसले. दरम्यान, या लिलावात लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक जोफ्रा आर्चर देखील होता.
इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला जोफ्रा आर्चरला आयपीएल २०२२ हंगामासाठी मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आर्चरसाठी लिलावात राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती. पण अखेर मुंबईने यात बाजी मारली. त्यामुळे आता मुंबईकडून सध्याच्या क्रिकेट जगतातील धोकादायक समजले जाणारे दोन वेगवान गोलंदाज एकत्र खेळताना दिसणार आहेत. हे दोन गोलंदाज म्हणजेच जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर.
यापूर्वी मुंबई संघाकडून बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोन वेगवान गोलंदाजांच्या जोडीने दमदार कामगिरी केली होती. मात्र, या लिलावापूर्वी बोल्टला मुंबईने मुक्त केले. त्यामुळे बोल्टला यंदाच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे.
जोफ्रा आर्चर गेल्या हंगामात दुखापतीमुळे खेळला नव्हता. पण तो गेल्या २ वर्षांपासून राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्याने ३५ आयपीएल सामने खेळले असून ४६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
यूपीच्या अष्टपैलूवर गुजरात टायटन्सने लावला डाव, तब्बल ३.२० कोटींची किंमत केली खर्च
अनकॅप्ड महिपाल लोमरोरची चांदी, ‘इतक्या’ लाखांसह आरसीबीत सामील; आयपीएलचा आहे चांगला अनुभव
‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला चेन्नईचा ‘सुपरकिंग’