जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना मोठी बोली लागली. मात्र, आता या खेळाडूंमुळे काही संघांचे मोठे नुकसान होणार आहे. पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड झालेल्या ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेले खेळाडू स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील काही सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसतील. याच मुद्द्यावर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. त्याचवेळी करारबद्ध असलेल्या आपल्या खेळाडूंनी ६ एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये सहभागी होऊ नये, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, या मुद्द्यावर बोलताना आयपीएल फ्रॅंचाईजीच्या एका अधिकार्याने म्हटले,
“खेळाडू अंतिम अकरामध्ये असतील तर आम्ही समजू शकतो. मात्र, सर्वच खेळाडूंना खेळण्यास बंदी घालणे चुकीचे आहे. सर्व संघ यामुळे नाराज आहेत. बीसीसीआयने या मुद्द्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा.”
तर संघांना होणार तोटा
पाकिस्तान दौरा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपेल. त्यानंतर खेळाडू भारतात दाखल होतील. खेळाडूंना चार ते सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यामुळे खेळाडू ११ किंवा १२ एप्रिलपासून खेळण्यासाठी उपलब्ध होतील. अशावेळी प्रत्येक संघ ३-४ सामने खेळले असतील. प्ले ऑफच्या दृष्टीने हे सामने निर्णायक ठरतील.
हे प्रमुख खेळाडू आहेत आयपीएलमध्ये सहभागी
आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल, जोस हेजलवूड व जेसन बेहरनडॉर्फ हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्स, मार्कस स्टॉयनिस लखनऊ सुपरजायंट्स आणि पॅट कमिन्स केकेआरसह करारबद्ध आहे. डॅनियल सॅम्स, नॅथन कुल्टर-नाईल, टीम डेव्हिड हे खेळाडू वार्षिक करारामध्ये समाविष्ट नसल्याने पहिल्या दिवसापासून स्पर्धेसाठी उपलब्ध असतील.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिला संघाची न्यूझीलंडविरुद्ध शरणागती! स्वीकारला सलग चौथा पराभव (mahasports.in)
पाकिस्तानी गोलंदाजाने भडकावली सहकार्याच्या श्रीमुखात! पीएसएलमधील व्हिडिओ व्हायरल (mahasports.in)
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला… (mahasports.in)