तब्बल ५३ दिवस आणि ६० सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पाच गड्यांनी पराभूत करत आयपीएल २०२० चे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदासह मुंबईने आपले पाचवे विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या विजेतेपदामुळे, खेळाडू म्हणून मुंबईसाठी पाचव्यावेळी तर एकूण सहाव्यावेळी आयपीएलची ट्रॉफी उंचावण्याची कामगिरी केली.
रोहित मंगळवारी(१० नोव्हेंबर) आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळण्यासाठी दुबईच्या मैदानावर उतरला. एमएस धोनीनंतर आयपीएलचे २०० सामने खेळणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनला. यासोबतच, रोहित मंगळवारी सहाव्यावेळी आयपीएलचा अंतिम सामना खेळत होता. रोहितपेक्षा फक्त धोनीनेच आयपीएलचे अधिक अंतिम सामने खेळले आहेत. धोनी आत्तापर्यंत आयपीएलच्या ९ अंतिम सामन्यात सहभागी झाला आहे.
रोहितने सहाव्या आयपीएल अंतिम सामन्यात सहभागी होताना, प्रत्येकवेळी आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची किमया केली. या सहापैकी तो एकदा डेक्कन चार्जर्ससाठी अंतिम सामना खेळला तर इतर पाचवेळी कर्णधाराच्या भूमिकेत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले.
रोहितने २००९ आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्ससाठी आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी डेक्कनने ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. यानंतर मुंबई इंडियन्ससाठी २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० यावर्षी अंतिम सामन्यात खेळताना त्याने विजेतेपद मिळविणाऱ्या संघाचा सदस्य होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, मुंबईसाठी खेळलेल्या सर्व अंतिम सामन्यात तो संघाचा कर्णधार होता.