१९ डिसेंबर २०१९ रोजी कोलकत्यातील आयटीसी हॉटेलमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होत होता. मोठमोठ्या खेळाडूंनी मोठमोठ्या रकमा मिळवल्यानंतर तरुण भारतीय खेळाडूंचा लिलाव होऊ लागला. राहुल त्रिपाठीला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतल्यानंतर, विराट सिंगचे नाव पुकारले गेले..आता हा विराट सिंग कोण ? असा प्रश्न पडणे साहजिक होते. कारण, क्रिकेट चाहत्यांसाठी विराट म्हणजे विराट कोहली…
लिलावकर्ता या नवीन विराटची माहिती देऊ लागला.. विराट बिनोद सिंग..वय २२.. डावखुरा सलामीवीर फलंदाज.. राज्य झारखंड.. अशी काहीशी ओळख लिलावकर्त्याने करून दिली आणि २० लाख आधारभूत किमतीपासून लिलावाला सुरुवात झाली.. किंग्स इलेव्हन पंजाबने त्याच्यावर बोली लावण्याचा श्रीगणेशा केला. सनरायझर्स हैदराबादने त्याला आव्हान दिले.. दोन्ही संघ त्याची बोली पन्नास लाखाच्या पार घेऊन गेल्यावर अचानक राजस्थान रॉयल्सने बोलीमध्ये उडी मारली.. काही वेळासाठी सनरायझर्सने माघार घेतली व राजस्थान व पंजाबमध्ये विराटसाठी रस्सीखेच सुरू झाली.. वीस लाखापासून सुरू झालेली बोली दीड कोटीपर्यंत गेली होती.. त्यावेळी राजस्थानने पुन्हा बोली लावण्यास नकार दिला.. विराट पंजाबचा संघात दाखल होतोय असे वाटतानाच पुन्हा सनरायझर्स लिलावात उतरले.. अखेरीस पंजाबला पछाडत सनरायझर्स हैदराबादने विराटवर १ कोटी ९० लाख बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
युसुफ पठाण, कार्लोस ब्रेथवेट, एविन लुईस, मार्टिन गुप्टिल, मनोज तिवारी यांसारख्या टी२० दिग्गजांवर कोणीही बोली लावली नाही तर दुसरीकडे विराट सारख्या अपरिचित चेहऱ्याला जवळपास दोन कोटीची रक्कम मिळाली.
इकडे, जमशेदपूरमधील विराटच्या छोट्याशा घरात उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. अगदी १२ वर्षे वयापासून क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या विराटला आयपीएलचे मैदान गाजवण्याची संधी जी मिळाली होती.
झारखंडचा असल्याने विराटचा प्रेरणास्त्रोत म्हणून एमएस धोनी शिवाय कोणी असू शकतो. धोनीचा खेळ पाहता पाहता, व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विराट फलंदाजीचे धडे गिरवू लागला. विराटच्या प्रगतीचा वेग इतका होता की, वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी त्याची झारखंडच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली होती. त्या विनू मंकड करंडक स्पर्धेत त्याने ५ डावात १५२ धावा फटकावल्या, ज्या फक्त त्याचाच सख्खा भाऊ विशाल सिंगपेक्षा कमी होत्या. सलग दोन कुचबिहार करंडक स्पर्धा गाजवत त्याने झारखंड रणजी संघासाठी दावेदारी ठोकली.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून प्रथमश्रेणी व वरिष्ठ स्तरावरील क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून तो रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, देवधर ट्रॉफी अशा अनेक स्पर्धा आपल्या दमदार प्रदर्शनाने गाजवू लागला. प्रथमश्रेणी क्रिकेट व लिस्ट ए क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढल्या असल्या तरी विराटला त्याच्या टी२० तील फटकेबाजीसाठी ओळखले जाते. विराटने आत्तापर्यंत ५६ टी२० सामने खेळत ३५.२७ च्या आदर्श सरासरीने १,५५२ धावा चोपल्या आहेत.
सध्या झारखंड क्रिकेट संघाचा अव्वल फलंदाज असलेला विराट सिंग, आयपीएल गाजवून भारतीय संघात विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी खेळताना दिसेल असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
ट्रेंडिंग लेख –
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
महत्त्वाच्या बातम्या –
६ षटकार ठोकत सिमन्सने केल्या ९६ धावा, नाईट रायडर्सने मिळविला सलग ८ वा विजय
धोनीला क्रिकेटचे धडे देणाऱ्या या मार्गदर्शकाच्या स्थितीत सुधारणा, ५ दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर
आयपीएलमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जॉन्टी र्होड्सने केली ‘ही’ विशेष मागणी