आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात शतकांचा वर्षाव झाला. पाहुण्या संघाच्या सलामीवीरांनी प्रत्येकी एक शतक झळकावले, तर यजमान संघाच्या अष्टपैलूनेही नाबाद शतक ठोकले. त्यातही दक्षिण आफ्रिकाचा सलामीवीर जानेमन मलान याने आपल्या शतकी खेळीचे दीडशतकात रुपांतर करत संघाचा विजय निश्चित केला. यासह त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. दक्षिण आफ्रिकाने ७० धावांनी हा सामना जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत संपवली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने ५० षटकांखेर ४ गडी गमावत तब्बल ३४६ धावा केल्या. यात २५ वर्षीय मलानच्या नाबाद १७७ धावांचा समावेश होता. १०४.७३ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत त्याने ही धावसंख्या केली होती. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि १६ चौकारही ठोकले होते. यासह त्याने दक्षिण आफ्रिकाकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये उडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकाच्या दिग्गजांच्या यादीत उडी
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सला मागे टाकत तो चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. डिविलियर्स १७६ धावांसह पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकाचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन सर्वाधिक नाबाद १८८ धावांसह या यादीत अव्वलस्थानी आहेत. तर फाफ डू प्लेसिस १८५ धावा आणि क्विंटन डी कॉक १७८ धावांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
बाबर आझमलाही सोडले पिछाडीवर
हेच जर आयसीसीच्या वनडे क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र वनडे क्रिकेटमधील या अव्वल फलंदाजावरही मलान वरचढ ठरला आहे. आतापर्यंत आजमने ८३ वनडे सामन्यातील ८१ डावांमध्ये फलंदाजी करताना १४ शतके केली आहेत. पण त्याची वनडेतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी १५८ धावा इतकी राहिली आहे.
मात्र मलानने कारकिर्दीतील केवळ सातव्या वनडे सामन्यांतील सहाव्या डावांत आझमपेक्षाही जास्त धावांची खेळी केली आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध सहाव्या वनडे डावात नाबाद १७७ धावा करत आझमला अर्थात वनडेतील अव्वल फलंदाजाला पिछाडीवर सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जबरदस्त! ‘या’ ३४ वर्षीय क्रिकेटरने आठव्या क्रमांकावर ठोकले नाबाद शतक, बनवला विश्वविक्रम
कोण जिंकणार इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका? सौरव गांगुलीने केली ‘ही’ भविष्यवाणी
आम्ही प्रेमावर प्रेम केलं…, भारतीय अष्टपैलू दुबे चढला बोहल्यावर; मैत्रीण अंजुम खानशी बांधली लग्नगाठ