आयर्लंडचा भारतीय वंशाचा अष्टपैलू क्रिकेटपटू सिमी सिंग लिव्हरच्या समस्येनं त्रस्त आहे. त्याच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. नुकतीच या खेळाडूच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली.
सिमी सिंग याचं लिव्हर ट्रान्सप्लांट पूर्णपणे यशस्वी झालंय. मात्र, डॉक्टरांनी त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, जेणेकरून त्याची प्रकृती बरी होईल. आयर्लंडमधील उपचारादरम्यान सिमीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्याचे कुटुंबीय त्याला भारतात घेऊन आले होते. सिमी सिंगच्या म्हणण्यानुसार, चुकीच्या औषधांच्या सेवनामुळे त्याला ही समस्या उद्भवली.
सिमी सिंगला नवं आयुष्य देण्यात त्याची पत्नी आगमदीपनं महत्त्वाची भूमिका बजावली. लिव्हर ट्रान्सप्लांट हाच त्याचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सिमी सिंगसाठी देणगीदाराचा शोध सुरू होता. मात्र त्यात यश आलं नाही. अशा परिस्थितीत सिमी सिंगची बिघडत चाललेली प्रकृती पाहून त्याची पत्नी आगमदीप हिनं तिचं लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सिमी सिंगचं प्राण वाचू शकलं.
सिमी सिंगनं चाहत्यांना आपल्या आरोग्याविषयी अपडेट देताना पत्नीचा उल्लेख केला. त्यानं स्वतःला भाग्यवान असल्याचं सांगितलं. सिमी सिंगची लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया तब्बल 12 तास चालली.
सिमी सिंग 2017 ते 2022 पर्यंत आयर्लंड क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. तो 2022 टी20 विश्वचषकात खेळला होता. मात्र, त्यानंतर त्याला लिव्हरच्या समस्येमुळे मैदानाबाहेर राहावं लागलं. आता यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची अपेक्षा आहे.
सिमी सिंगनं आयर्लंडकडून एकूण 35 एकदिवसीय आणि 53 टी20 सामने खेळले. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 39 विकेट आणि 593 धावा आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 44 विकेटसह 296 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सिमी सिंगनं एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावलंय.
हेही वाचा –
विराट कोहली नाही, हा आहे टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडू! जसप्रीत बुमराहनं दिलं आश्चर्यकारक उत्तर
आयपीएल रिटेन्शन नियमांबाबत मोठी बातमी! या दिवशी जाहीर होणार रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या
स्टाईल मारायला गॉगल घालून आला, शून्यावर बाद होऊन तंबूत परतला! भारताच्या स्टार खेळाडूची फजिती