क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्त्व आहे. उत्तम फिटनेस नसल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू फिटनेसची विशेष काळजी घेतात.
भारतीय संघात जेव्हा-जेव्हा फिटनेसची चर्चा होते, तेव्हा सर्वात पहिलं नाव येतं ते विराट कोहलीचं. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाचा फिटेस्ट खेळाडू म्हणून विराट कोहलीचं नाव घेतलं नाही! बुमराहनं आपल्या उत्तरानं सर्वांनाच चकित केलं. एका कार्यक्रमादरम्यान बुमराहला टीम इंडियाच्या सर्वात फिट खेळाडूबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यानं आश्चर्यकारक उत्तर दिलं.
या प्रश्नावर उत्तर देताना बुमराह म्हणाला, “तुम्हाला काय उत्तर हवं, हे मला माहीत आहे. मात्र मला माझं नाव घ्यायला आवडेल. कारण मी एक वेगवान गोलंदाज आहे. मी खूप दिवसांपासून खेळत आहे. एक वेगवान गोलंदाज असून या गर्मीत या देशामध्ये खेळण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे मी नेहमी वेगवान गोलंदाजांना प्रोत्साहित करेल आणि त्यांचं नाव घेईल.”
टीम इंडियाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे जसप्रीत बुमराह सुमारे अडीच महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेल. याआधी बुमराह टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
जसप्रीत बुमराहला गेल्या महिन्यात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. आता तो कसोटी क्रिकेटद्वारे भारतीय संघात पुनरागमन करेल. या मालिकेनंतर भारताला ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात आणि डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात कसोटी मालिका खेळायची आहे.
हेही वाचा –
आयपीएल रिटेन्शन नियमांबाबत मोठी बातमी! या दिवशी जाहीर होणार रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या
स्टाईल मारायला गॉगल घालून आला, शून्यावर बाद होऊन तंबूत परतला! भारताच्या स्टार खेळाडूची फजिती
सर्व 11 खेळाडूंनी मिळून फलंदाजाला घेरलं, अशी फिल्डिंग कधी पाहिली का? ; व्हिडिओ व्हायरल