---Advertisement---

२००७ टी२० विश्वचषक फायनलचा ‘सामनावीर’ इरफान पठाणचा क्रिकेटला अलविदा

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 5:52 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने आज सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी20 सामने खेळले आहेत.

यामध्ये त्याने कसोटीत 1105 धावा आणि 100 विकेट्स, वनडेत 1544 धावा आणि 173 विकेट्स आणि टी20 मध्ये 172 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत.

तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा तसेच जम्मू आणि काश्मिर संघाकडून खेळला. त्याने जम्मू आणि काश्मिर संघाकडून खेळताना संघाच्या मार्गदर्शकाची भूमिकाही निभावली.

इरफानने भारताच्या अनेक मोठ्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. तो 2007 च्या टी20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.

हा सामना भारताने 5 धावांनी जिंकून विजेतेपद मिळवले होते. या अंतिम सामन्यात त्याने 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

याबरोबरच इरफानने 2006 ला कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात हॅट्रिक घेतली होती. तो कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा हरभजन सिंगनंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता.

त्याचबरोबर 2013मध्ये भारतीय संघाने विजेतेपद मिळवलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही इरफानचा भारतीय संघात समावेश होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

इरफान भारताकडून शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर 2012ला खेळला आहे.

इरफानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 122 प्रथम श्रेणी सामने खेळताना 4559 धावा केल्या आहेत आणि 384 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 193 अ दर्जाचे सामने खेळताना 2454 धावा आणि 272 विकेट्स घेतल्या आहेत.

इरफानने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैद्राबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये 103 सामने खेळताना 1139 धावा केल्या आहेत आणि 80 विकेट्स घेतल्या आहेत.

7 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला इरफान सध्या बऱ्याचदा समालोचन करताना दिसतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---