टी२० विश्वचषक-२०२१ मधील सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते, पण सुपर १२ मध्ये ज्याप्रकारे भारतीय संघाने आपला पहिला सामना खेळला ते अनपेक्षित होते. भारतीय संघाला आपला पारंपारिक प्रतिद्वंदी पाकिस्तान संघाकडून पराभूत व्हावे लागले. आता, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (३१ ऑक्टोबर) या स्पर्धेतील २८ वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांसाठी विजय मिळवणे खूप महत्त्वाचे असेल.
भारताप्रमाणेच न्यूझीलंडलाही पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हे तिन्ही संघ गट २ मध्ये खेळत आहेत. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून पाकिस्तान अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर न्यूझीलंड आणि भारत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. प्रत्येक गटातून फक्त २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड संकटात सापडले आहेत. त्यातच भारतीय संघासाठी न्यूझीलंडचा एक फिरकी गोलंदाज त्रासदायक ठरू शकतो.
न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा फिरकी गोलंदाज ईश सोधी हा भारताविरुद्ध जगातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. या गोलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध टी-२० प्रकारामध्ये १७ विकेट घेतल्या आहेत. आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. ईश सोधीनंतर, या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराचे नाव सामील आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वात १४ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, मिचेल सॅन्टनर १२ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.
सुपर-१२ च्या गट २ मध्ये न्यूझीलंड चौथ्या, तर भारत पाचव्या स्थानावर आहे. या संघांमध्ये नामिबिया पुढे आहे. त्याचबरोबर पाकिस्तान ४ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. इथून पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे, तर न्यूझीलंड आणि भारताच्या संघांसाठी अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे गट १ मध्ये इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर श्रीलंका चौथ्या स्थानी आहे. बांगलादेशने आपले दोन्ही सामने गमावल्याने त्यांचा प्रवास आता संपुष्टात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…तरच हार्दिकला न्यूझीलंडविरुद्ध मिळणार संधी? फिटनेसविषयी आली मोठी अपडेट
जीम ते इंग्लड व्हाया चेन्नई! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लिकल यांनी अशी फुलली प्रेम कहाणी






