आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी सर्व १० संघांची तयारी चालू आहे. बीसीसीआयने २०२२ हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये मेगा लिलावाचे आयोजन केले आहे. पुढच्या हंगामापूर्वी प्रत्येक फ्रेंचायझीने काही खेळाडूंना संघात रिटेन केले आहे. दिग्गज विराट कोहलीला त्यांची फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) रिटेन केले आहे. पण पुढच्या हंगामात तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाहीये. अशात आरसीबीला एका नवीन कर्णधाराची आवश्यकता निर्माण झाली आहे. आरसीबीने रविवारी एक व्हिडिओ शेअर करून त्या खेळाडूंची माहिती दिली, जे संघाचे कर्णधार बनू शकतात. या यादीत युवा यष्टीरक्षक ईशान किशन (ishan kishan) याचेही नाव आहे.
व्हिडिओत पाच खेळाडूंच्या नावांचा उल्लेख केला गेला आहे. सर्वप्रथम श्रेयस अय्यरचे (shreyas iyer) नाव आहे. अय्यर २३ व्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनला होता. त्याने संघाला पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवून दिले होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि रिषभ पंत दिल्ली संघाचा कर्णधार बनला. त्यानंतर अय्यर तंदुरुस्त झाला, पण कर्णधारपद पंतकडेच कायम ठेवण्यात आले. पंत अजूनही दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे आणि संघाने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे. परंतु, अय्यर मात्र मेगा लिलावात सहभागी झाला आहे.
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डर (jason holder) देखील आरसीबीच्या कर्णधारपदासाठी दावेदार आहे. होल्डर कमी वयात वेस्ट इंडीजचा कर्णधार बनला होता. अष्टपैलूच्या रूपातील त्याने वेस्ट इंडीजसाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. इंग्लंडचा मर्यादित षटकांतील कर्णधार ओएन मॉर्गन (eoin morgan) याचेही नाव आरसीबीच्या कर्णधारपदासाठी शर्यतीत आहे. २०१९ विश्वचषकात मार्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडने जेतेपद पटकावले होते. मागच्या आयपीएल हंगामात त्याने केकेआरचे नेतृत्व केले. त्याने केकेआर संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्जकडून संघाला पराभव पत्करावा लागला होता.
युवा यष्टीरक्षक ईशान किशन मागच्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता. ईशानने यापूर्वी भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व केले आहे आणि संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. ईशान त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर (david warner) या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरले सनरायझर्स हैदराबादला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. त्याच्या नावावर टी२० मध्ये ५ हजार पेक्षा अधिक धावा आहेत. वॉर्नरची कारकीर्द पाहता आरसीबीच्या कर्णधारपदासाठी तो एक प्रवळ दावेदार आहे. त्याव्यतिरिक्त आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व त्याच्याकडे जाण्याचीही शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
कोरोनासारख्या संकटांवर मात करत यश धूलच्या भारतीय संघाने जिंकला विश्वचषक, वाचा संघाचा संपूर्ण प्रवास
गांगुली, अश्विन ते रहाणे, भारताच्या विश्वविजेत्या ‘यंगिस्तान’चं होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स
दुःखद बातमी: सुरेश रैनाला पितृशोक; कॅन्सरविरुद्धची झुंज अखेर संपली