शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना खेळला गेला. पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेणाऱ्या बांगलादेशला भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत धूळ चारली. या सामन्यात भारताच्या ईशान किशनने द्विशतक आणि विराट कोहलीने शतक ठोकले. ईशानच्या या विक्रमी द्विशतकानंतर बोलताना त्याचे आई-वडील भावूक झालेले दिसले.
पहिल्या दोन सामन्यात जागा न मिळालेल्या ईशानने तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याची जागा घेत संधीचं सोनं केलं. ईशानने आधी 49 चेंडूत त्याचे अर्धशतक साकारले. त्यानंतर पुढे 85 चेंडूत 100 धावा चोपल्या. पुढे दीडशतक करण्यासाठी त्याला 103 चेंडूंचा सामना करावा लागला. शेवटी 126 चेंडूत त्याने आपले द्विशतक साकारले. अशी कामगिरी करणारा तो भारतीय संघाचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी रोहित, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी अशी कामगिरी केली होती. ईशानने या खेळीत 131 चेंडूत 210 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 10 षटकार आणि 24 चौकारांचा पाऊस पाडला.
त्याच्या या खेळीनंतर बोलताना त्याचे वडील म्हणाले,
“हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे. त्याच्यासह आम्हालाही इतकेच वाटते की, त्याने सातत्याने भारतीय संघासाठी खेळावे. तसेच, संघाच्या विजयात नेहमीच अशा प्रकारे योगदान द्यावे. तो उत्कृष्ट खेळत राहिला तर त्याला संधी देखील मिळतील.”
त्याची आई सुमित्रा देवी म्हणाल्या,
“ईशानला संधी मिळावी अशी प्रार्थना आम्ही करत होतो. त्याने संधी मिळताच लाभ घेतला आणि अशा प्रकारचा खेळ दाखवला. त्याचा खेळ पाहून नक्कीच आनंद झाला.”
ईशानच्या या खेळीने चाहत्यांसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूही आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर देखील त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतेय.
(Ishan Kishan Parents Reaction After His 200)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लिटन दासचे इशान किशनविषयी मोठे विधान, केएल राहुल म्हणाला…