भारत-बांगलादेश यांच्यातल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत इशान किशानला भारतीय संघात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. यानंतर इशानच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आली आहे.
वास्तविक, आगामी रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्या दोन सामन्यांसाठी इशान किशनला झारखंडचा कर्णधार बनवण्यात आलंय. इशान गेल्या रणजी हंगामात खेळला नव्हता, ज्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थान गमवावं लागलं होतं. परंतु आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम करण्यास तयार आहे. रणजीमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी इशानसाठी नवीन नाही. याआधी 2018-19 च्या मोसमातही त्यानं झारखंड संघाचं नेतृत्व केलं होतं.
इशान किशन काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. तो पहिल्यांदा बुची बाबू टूर्नामेंटमध्ये खेळला, जिथे त्यानं जबरदस्त शतक झळकावलं. यानंतर त्यानं दुलीप ट्रॉफीमध्येही भाग घेतला, जिथे त्यानं शतक झळकावलं. मात्र, इराणी कपमध्ये इशानची बॅट चालली नाही. त्याला एका डावात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यानं 38 धावा केल्या.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर इशानला बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत यष्टिरक्षक म्हणून संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अशा स्थितीत आता इशानने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये धावा करून त्याला भारतीय संघात पुनरागमन करायचं आहे.
झारखंडनं रणजी ट्रॉफीच्या आगामी हंगामातील पहिल्या दोन सामन्यांसाठी 16 खेळाडूंची निवड केली. यामध्ये इशान किशन व्यतिरिक्त कुमार कुशाग्रा आणि अनुकुल रॉय देखील आहेत. कुशाग्र हा एक यष्टिरक्षक आहे. त्यामुळे इशान इराणी चषकाप्रमाणे रणजी ट्रॉफीमध्ये देखील एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून प्लेइंग 11 मध्ये दिसू शकतो. विराट सिंगची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या दोन सामन्यांसाठी झारखंडचा संघ – इशान किशन (कर्णधार), विराट सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), नाझिम सिद्दीकी, आर्यमन सेन, शरणदीप सिंग, कुमार सूरज, अनुकुल रॉय, उत्कर्ष सिंग, सुप्रियो चक्रवर्ती, सौरभ शेखर, विकास कुमार, विवेकानंद तिवारी, मनिषी, रविकुमार यादव, रौनक कुमार
हेही वाचा –
4 कसोटी 4 शतकं, डॉन ब्रॅडमनपेक्षा कमी नाही हा क्रिकेटपटू! कसोटीत करतो वनडे स्टाईल फलंदाजी
रोहित शर्माचा साधेपणा! भर रस्त्यात थांबून दिल्या चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; सुंदर VIDEO व्हायरल
आयसीसी रँकिंग : अर्शदीप सिंगची टॉप 10 मध्ये एंट्री! हार्दिक पांड्यालाही बंपर फायदा