भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमवर खेळविला जाईल. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आपल्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला इशांतने मर्यादित षटकांचे सामने खेळण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
मर्यादित षटकांचे क्रिकेट न खेळण्याविषयी दिली प्रतिक्रिया
इशांतने अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याची भारतीय संघात वनडे व टी२० सामन्यासाठी निवड न होण्याविषयी विचारले असता तो म्हणाला, “मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळत नाही, हे एकप्रकारे चांगले आहे. हे स्वरूप मला खेळायचे नव्हते असे नाही. एक खेळाडू म्हणून खेळायला मिळणे हेच खूप आहे. मी इतर गोष्टींचा जास्त विचार करत नाही. मी किमान एक फॉर्मेट खेळत आहे आणि त्यासाठी मी संघाचा आभारी आहे. मी ज्या स्वरूपात खेळत आहे त्यामध्ये चांगले प्रदर्शन करून सामना जिंकवण्याची माझी इच्छा असते. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते तेव्हा मी सकारात्मक विचार करतो. हे आपली कामगिरी सुधारण्यास मदत करते.”
इशांत खेळणार आहे आपला शंभरावा कसोटी सामना
अहमदाबाद येथे होणारच दिवस-रात्र कसोटी सामना इशांतच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना असेल. कपिल देव यांच्यानंतर १०० कसोटी सामने खेळणारा तो अवघा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. २००७ मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या इशांतने आत्तापर्यंत ९९ कसोटी खेळताना ३०२ बळी आपल्या नावे केले आहेत. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानी आहे.
मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर आहे इशांत
भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख खेळाडू असलेला ईशांत भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून बऱ्याच वर्षापासून बाहेर आहे. त्याने आपला अखेरचा वनडे सामना जानेवारी २०१६ मध्ये खेळला होता. तसेच, अखेरचा टी२० सामना २०१४ साली खेळलेला. मात्र, तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
महत्वाच्या बातम्या:
शतकानंतर वडिलांच्या आठवणीने कृणाल पंड्या झाला भावूक, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ
माजी भारतीय दिग्गज बेदी यांची प्रकृती चिंताजनक, करण्यात आली बायपास सर्जरी
युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! मास्टर ब्लास्टर देणार फलंदाजीचं मोफत प्रशिक्षण, पाहा कसं ते