भुवनेश्वर | हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात पदार्पण करणाऱ्या दोन संघांमधील लढतीत बेंगळुरू एफसीने येथील कलिंगा स्टेडियमवर जमशेदपूर एफसीला 2-0 असे हरविले. या पराभवामुळे जमशेदपूरची उपांत्य फेरीच्या दिशेने सुरु असलेली घोडदौड खंडित झाली. बेंगळुरूने आपली आगेकूच यापूर्वीच निश्चित केली आहे.
बेंगळुरूचे दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. मिकूने पेनल्टीवर खाते उघडले, तर कर्णधार सुनील छेत्रीने दुसरा गोल केला. छेत्रीचा हा मोसमातील दहावा गोल आहे. आयएसएलच्या एका मोसमात दहा गोल केलेला तो पहिला भारतीय ठरला.
जमशेदपूरने गेल्या चार सामन्यांत तीन विजय व एक बरोबरी अशा कामगिरीसह अपराजित मालिका राखली होती. घरच्या मैदानावर त्यांनी कामगिरी उंचावली होती, पण यावेळी बेंगळुरूच्या परिपूर्ण खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही. इझू अझुका याचे काही प्रयत्न बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग याने रोखले. बेंगळुरूने बाहेरील सामन्यांत (अवे मॅचेस) सलग चौथा व एकूण सातवा विजय मिळविला. यंदा आतापर्यंत ही कामगिरी सर्वोत्तम आहे.
आघाडीवरील बेंगळुरूचा 17 सामन्यांत हा 12वा विजय असून एक बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 37 गुण झाले. जमशेदपूरला 17 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. सात विजय व पाच बरोबरींसह त्यांचे 26 गुण व चौथे स्थान कायम राहिले. जमशेदपूरचा एकच सामना बाकी आहे. पुढील रविवारी त्यांची गोव्याशी लढत होईल. जमशेदपूरला आगेकूच करण्यासाठी यात विजय अनिवार्य असेल आणि इतर निकालांवरही त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. पुणे सिटी दुसऱ्या, तर चेन्नईयीन एफसी तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांची 17 सामन्यांतून 29 गुण अशी समान कामगिरी आहे.
बेंगळूरने चेंडूवर ताबा ठेवत सुरवात सकारात्मक केली. 21व्या मिनिटाला मिकूने आगेकूच केली. नेटजवळ बचावाच्या प्रयत्नात जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉलने त्याला पाडले. त्यामुळे पंचांनी सुब्रतला पिवळे कार्ड दाखविताना बेंगळुरूला पेनल्टी बहाल केली. या निर्णयावर हुज्जत घातल्याबद्दल वेलींग्टन प्रिओरी याला सुद्धा पिवळे कार्ड दाखविण्यात आले. मग मिकू पेनल्टी घेण्यास सज्ज झाला. त्याने हळू धावत सुब्रतला चकविले आणि नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारत पेनल्टीवर गोल केला. मिकूचा हा स्पर्धेतील 13वा गोल आहे. यातील 11 गोल त्याने बाहेरील सामन्यांत (अवे मॅचेस) केले आहेत.
बेंगळुरूने पकड कायम ठेवत जमशेदपूरच्या क्षेत्रात चढाया सुरुच ठेवल्या. 34व्या मिनिटाला त्यांनी उजवीकडे कॉर्नर मिळविला. डिमास डेल्गाडोने अप्रतिम चेंडू मारला. छेत्रीने प्रिओरीपेक्षा सरस उडी घेत ताकदवान हेडींग केले आणि सुब्रतला चकवित गोल नोंदविला.
निकाल :
जमशेदपूर एफसी : 0 पराभूत विरुद्ध
बेंगळुरू एफसी : 2 (मिकू 23-पेनल्टी, सुनील छेत्री 34)