जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात आज (1 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. याबरोबरच नॉर्थइस्टने गुणतक्त्यात दुसरा क्रमांक गाठताना एफसी गोवा संघाला मागे टाकले.
जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात दोन्ही संघ निर्णायक गोल करू शकले नाहीत. त्यांना चांगल्या चालींचे फिनिशींगअभावी गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. नॉर्थइस्टने नऊ सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून पाच विजय व एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 18 गुण झाले. त्यांनी गोव्याला (9 सामन्यांतून 17) मागे टाकले. जमशेदपूरने चौथे स्थान कायम राखले. 10 सामन्यांत तीन विजय, सहा बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. बेंगळुरू एफसी आठ सामन्यांतून 22 गुणांसह आघाडीवर आहे.
दोन्ही संघांची सुरवात सावध होती. सुरवातीला त्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. नवव्या मिनिटाला जमशेदपूरने पहिला प्रयत्न केला. मेमोने मध्य क्षेत्रातून उजव्या बाजूने आगेकूच केली. त्याने पाब्लो मॉर्गाडोला पास दिला. पाब्लोने फटका मारला, पण थोडक्यात हुकला.
ओगबेचेने 12व्या मिनिटाला बॉक्समध्ये चेंडू मिळताच धाडसी प्रयत्न केला. नेटकडे पाठ असूनही त्याने प्रतिस्पर्ध्याला चकवित चेंडू छातीने नियंत्रीत केला. त्याच्या पासवर रॉलीन बोर्जेसने प्रयत्न केला. त्यावेळी जमशेदपूरच्या प्रतिक चौधरीने मैदानावर घसरत बचावाचा प्रयत्न केला, पण बोर्जेसचा फटका स्वैर होता. त्यामुळे चेंडू नेटवरून गेला.
जमशेदपूरने तोपर्यंत खेळावर पकड घेतली होती. 22व्या मिनिटाला मारीओ आर्क्वेसने प्रयत्न केला, पण चेंडू क्रॉसबारवरून गेला. 26व्या मिनिटाला नॉर्थइस्टच्या लालथाथांगा खॉल्हरिंग याने फ्री किकवर चेंडू मिळताच फटका मारला, पण तो अचूकता साधू शकला नाही.
जमशेदपूरने बचावही भक्कम ठेवला. 31व्या मिनिटाला ओगबेचेला 25 यार्डावर चेंडू मिळाला, पण स्वैर फटक्यामुळे ही संधी गेली. जमशेदपूरला 37व्या मिनिटाला फ्री किक मिळाली. प्रोवात लाक्राने मायकेल सुसैराजला मागून धक्का दिला होता. फ्री किकचा इशारा होताच जमशेदपूरच्या खेळाडूने मारलेला चेंडू बॉक्समध्ये डावीकडे असलेल्या कार्लोस कॅल्वोला मिळाला. त्याने प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.
दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला फेडेरीको गॅलेगोने फटका अप्रतिम मारण्याच्या प्रयत्नात अचूकता गमावली. 70व्या मिनिटाला फारुख चौधरीने उजवीकडून मोबाशीर रेहमान याला बॉक्सपाशी पास दिला, पण मोबाशीरचा चेंडू क्रॉसबारवरून गेला. 77व्या मिनिटाला ओगबेचेने टिरीला मागे टाकत उजवीकडून घोडदौड केली. त्याने स्वतःला संधी असूनही गॅलेगोला पास दिला, पण तोपर्यंत जमशेदपूरच्या बचावपटूंनी आपले क्षेत्र सुरक्षित करीत दडपण आणले. त्यामुळे गॅलेगोचा फटका ब्लॉक झाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव
–दुखापतीनंतर पृथ्वी शॉ जास्त बोलतही नाही, अश्विनने दिली माहिती
–Video: कर्णधार विराट कोहलीने विकेट घेत केले असे जबरदस्त सेलिब्रेशन