fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ISL 2018: कामगिरी उंचावण्यासाठी नॉर्थइस्ट, मुंबई प्रेरित

गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने आतापर्यंत उत्तम अशी कामगिरी केली आहे. शुक्रवारी त्यांची मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीसाठी कामगिरी आणखी उंचावण्याकरीता नॉर्थइस्टप्रमाणेच मुंबई सुद्धा प्रेरित झाला असेल. येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर ही लढत होईल.

नॉर्थइस्ट तिसऱ्या, तर मुंबईचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे, पण दोन्ही संघांमध्ये केवळ एका गुणाचा फरक आहे. यात यजमान नॉर्थइस्ट एक सामना कमी खेळले आहेत. नॉर्थइस्टचे पाच सामन्यांतून 11, तर मुंबईचे सहा सामन्यांतून दहा गुण आहेत.

नॉर्थइस्टने एल्को शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोसमाला उत्तम प्रारंभ केला आहे. बार्थोलोम्यू ओगबेचे आणि फेडेरिको गॅलेगो यांची आघाडी फळीतील जोडी प्रतिस्पर्ध्याच्या बचाव फळीसमोर धोकादायक आव्हान निर्माण करते. ओगबेचे याने पाच सामन्यांतून सहा गोल केले आहेत. एफसी गोवा संघाच्या फेरॅन कोरोमीनास याच्या साथीत तो सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत संयुक्त आघाडीवर आहे. गॅलेगो हा अॅसिस्टच्या क्रमवारीत आघाडीवर आहे. त्याने पाच सामन्यांतून चार अॅसिस्ट केले आहेत.

शात्तोरी यांच्या संघाने अवे सामन्यांत तीन पैकी तीन विजय मिळवून परिपूर्ण कामगिरी केली आहे, पण घरच्या मैदानावर त्यांना अद्याप निर्णायक विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबईच्या कामगिरीत सातत्य कमी आहे. अशावेळी या लढतीत संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करावे असे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा यांना अपेक्षित आहे. त्यामुळे ते नॉर्थइस्टच्या घरच्या मैदानावरील सातत्याच्या अभावाचा फायदा उठविण्यास प्रयत्नशील असतील.

कोस्टा यांनी सांगितले की, नॉर्थइस्टने मोसमाला प्रारंभ चांगला केला आहे. गेले दोन-तीन दिवस मी नॉर्थइस्टच्या लढतींचा अभ्यास करीत असून त्यांचा खेळ फार चांगला आहे. 90 मिनिटांच्या वेळेत सुसंघटित स्वरुप ठेवण्याच्या बाबतीतही ते चांगली कामगिरी करतात. याचा अर्थ हा सामना आमच्यासाठी अवघड आहे, पण शेवटी शुक्रवारी मैदानावर 11 खेळाडू विरुद्ध 11 खेळाडू अशी लढत असेल. आम्ही सुद्धा फार चांगला खेळ करू शकतो. तीन गुण जिंकूनच परतण्याची आमची इच्छा आहे.

एफसी गोवा संघाकडून 0-5 असा धुव्वा उडाल्यानंतर मुंबईने पाठोपाठ दोन विजय मिळवून आव्हान पुन्हा निर्माण केले. त्यांनी दिल्ली डायनॅमोज एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांना हरविले. मोडोऊ सौगौ याचा गोलसमोरील फॉर्म कोस्टा यांच्यासाठी उत्साहवर्धक आहे. नॉर्थइस्टच्या भक्कम बचाव फळीसमोर तो आव्हान निर्माण करू शकतो.

शात्तोरी यांना बचावपटू गुरविंदर सिंग याला मुकावे लागेल. तो जायबंदी झाला आहे, पण तो नसल्यामुळे शात्तोरी फार चिंतेत पडलेले नाहीत. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक गोल जास्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यामुळे आमच्या बचाव फळीला पाठबळ मिळेल अशी आशा आहे. आमचा बचाव डळमळीत असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे, पण बेंगळरू एफसीनंतर सर्वांत कमी गोल आमच्याविरुद्ध झाले आहेत. आमचा खेळ चांगला संघटित आहे आणि मुंबईविरुद्ध आम्ही तो कायम ठेवू अशी आशा आहे.

मागील सामन्यात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीचा ढिसाळ बचाव मुंबईने उद्ध्वस्त केला होता. त्या लढतीत मुंबईच्या आघाडी फळीने कमालीची जिगर दाखविली होती. अशाच खेळाच्या जोरावर ते नॉर्थइस्टचा बचाव भेदू शकतील का याची उत्सुकता आहे.

You might also like