गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी गतउपविजेत्या चेन्नईयन एफसीने सफाईदार सलामी दिली. जमशेदपूर एफसीवर 2-1 अशी मात करीत चेन्नईयनने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला.
चेन्नईयन एकाच गोलच्या फरकाने जिंकले असले तरी त्यांचा धडाका काही औरच होता. पहिल्याच मिनिटाला खाते उघडलेला अनिरुध थापा आणि गिनीया-बिसाऊचा आंतरराष्ट्रीय खेळाडू इस्माईल गोन्साल्वीस यांनी गोल केले. गतमोसमात गोल्डन बुटचा मानकरी ठरलेल्या नेरीयूस वॅल्सकीसने जमशेदपूरची पिछाडी कमी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.
क्साबा लॅसझ्लो यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईयनने तीन गुणांची कमाई केली. याबरोबरच सरस गोलफरकामुळे गुणतक्त्यात आघाडीही घेतली. टिळक मैदानावरील लढतीची सुरवात सनसनाटी झाली. पहिल्याच मिनिटाला चेन्नईयनने खाते उघडले. दहा नंबरची जर्सी परिधान करणारा मध्यरक्षक रॅफेल क्रिव्हेलारो याने ही चाल रचली. उजवीकडे त्याने इस्माईलला पास दिला. मग इस्माईलने मुसंडी मारत मैदानालगत थापाच्या दिशेने चेंडू मारला. थापा सुद्धा या चालीचा धुर्तपणे अंदाज घेत आगेकूच करीत होता. त्यामुळे तो सफाईदार फिनिशींग करीत जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकवू शकला.
त्यानंतर 25व्या मिनिटास इसाक वनमाल्साव्मा याने चेन्नईयीनच्या लालीयनझुला छांगटेला गोलक्षेत्रात पाठीमागून पाडले. परिणामी पंच संतोष कुमार यांनी चेन्नईयीनला पेनल्टी बहाल केली. इस्माईलने रेहेनेशच्या उजवीकडून चेंडू मारला. अंदाज चुकल्याने रेहेनेश विरुद्ध बाजूला झेपावला होता. या गोलनंतर चेन्नईयनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
पूर्वार्धात पिछाडी कमी करण्याची बहुमोल कामगिरी जमशेदपूरने बजावली. जॅकीचंद सिंगने उजवीकडे चेंडू मिळताच आगेकूच केली. त्याने अफलातून चेंडू मारला. त्यानंतर नेरीयूसने जोरदार उडी घेत हेडिंगवर चेंडूला नेटची दिशा दिली. त्यावेळी चेन्नईयनचा गोलरक्षक विशाल कैथ याला अजिबात संधी मिळाली नाही.